
स्थैर्य, फलटण, दि. ३ सप्टेंबर : नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणांमध्ये आजमितीला एकूण ४८.०६ टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध असून, धरणे ९९.३६ टक्के भरली आहेत. भाटघर आणि नीरा देवघर ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० टक्के भरली असल्याने, फलटण तालुक्यासह परिसरातील पाण्याची चिंता मिटली आहे.
नीरा उजवा कालवा विभागाने आज प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, वीर धरण ९७.६६ टक्के भरले आहे, तर गुणवडी धरणात ९५.६६ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या दिवशी धरणांमध्ये एकूण ९९.३० टक्के पाणीसाठा होता, त्यामुळे यंदाची स्थितीही अत्यंत समाधानकारक आहे.
धरणांमधील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात ४,५९२ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. नदीतील विसर्ग कायम असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुबलक पाणीसाठ्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

