
स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑगस्ट : फलटण तालुक्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणे जोरदार पावसामुळे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. वीर आणि नीरा देवघर ही दोन महत्त्वाची धरणे १०० टक्क्यांच्या जवळ पोहोचली असून, एकूण पाणीसाठा ४६ टीएमसीच्या पुढे गेला आहे. या समाधानकारक धरणसाठ्यामुळे फलटण तालुक्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नीरा उजवा कालवा विभागाने आज, दि. ६ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नीरा देवघर धरण ९१.११% (१०.६९ टीएमसी) तर वीर धरण ९४.६२% (८.९ टीएमसी) भरले आहे. याशिवाय, भाटघर धरण ९७.३४% (२२.८८ टीएमसी) आणि गुंजवणी धरण ७२.००% (२.६६ टीएमसी) भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे.
सर्व धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा ४८.३३ टीएमसी झाला आहे. पाण्याची वाढती आवक लक्षात घेता, वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात १४ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा धरणे वेळेवर आणि समाधानकारक भरल्याने फलटण तालुक्याचा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटला आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे.