धरणे तुडुंब, पण शहर व उपनगरे तहानलेली; साठवण टाक्या भरण्यासाठी कॅनॉलला पाणी सोडण्याची मागणी

नीरा प्रणालीत १०० टक्के पाणीसाठा; कॅनॉलच्या अस्तरीकरण कामामुळे फलटणमध्ये पाणीकपात सुरू


स्थैर्य, फलटण, दि. २६ सप्टेंबर : नीरा प्रणालीतील सर्व प्रमुख धरणे १०० टक्के क्षमतेने भरलेली असताना, दुसरीकडे फलटण शहरातून जाणाऱ्या कॅनॉलच्या अस्तरीकरणाच्या कामामुळे शहर आणि उपनगरांमध्ये पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या विरोधाभासी परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, किमान नगरपरिषद आणि विविध ग्रामपंचायतींच्या पाण्याच्या साठवण टाक्या भरण्यापुरते तरी कॅनॉलला पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

नीरा उजवा कालवा विभागाने आज प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, नीरा देवघर, भटघर, वीर आणि गुंजवणी या चारही धरणांमध्ये मिळून एकूण ४८.३३ टीएमसी म्हणजेच १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. वीर धरणातून २८०० क्युसेक्स, तर नीरा देवघर आणि गुंजवणी धरणातून अनुक्रमे ३७५ व २५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

एकीकडे पाण्याची मुबलक उपलब्धता असताना, फलटण शहरातील कॅनॉल अस्तरीकरणाच्या कामामुळे कालवा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेला पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात करावी लागली आहे. ऐन सणासुदीच्या काळात पाणीकपातीचा सामना करावा लागत असल्याने, प्रशासनाने तातडीने तोडगा काढून पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी तरी पाणी सोडावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!