
दैनिक स्थैर्य । दि.२८ जानेवारी २०२२ । सातारा । ठोसेघर, ता. सातारा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या मालदेव वस्तीनजिक असणाऱ्या गव्हाच्या शेतीचे रानगवे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. बुधवारी दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सुमारे सहा रानगव्यांचा समावेश असणारा कळपाने गव्हाच्या शेतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांनी तो प्रयत्न हाणून पाडत त्यांना हुसकावून लावले. दरम्यान वन विभागाने रानगव्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, मालदेव वस्ती परिसरातील शेतीला कुंपण घालावे अशी मागणी यानिमित्ताने होऊ लागली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी ठोसेघर येथून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर मालदेव वस्ती आहे. या ठिकाणी वास्तव्य करत असलेले शेतकरी प्रमुख्याने भात, गहू, भुईमूग आणि स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतात. सध्या शेतकऱ्यांनी गहु पेरले असून ८ ते १० इंच उंच गव्हाची वाढ झाली आहे. महादेव वस्ती नजीक असणाऱ्या सांडसा नावाच्या शिवारात चव्हाण, पांढरमिसे, शेडगे यांची शेती असून या सर्वांनी गहु पेरले आहेत. या ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून रानगवे येत असून त्यांनी गहु खाण्यासह गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यास सुरू केले असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीकडेला रात्रगस्त सुरू केली आहे.
शेतकरी बुधवारी रात्री रात्री गस्त घालत असताना ७.३० वाजण्याच्या सुमारास पाच रानगवे, पिल्लू असा रानगव्यांचा कळप सांडसा शिवारात दाखल झाला. याबाबतची माहिती शेतकऱ्यांना कळताच सुमारे दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी एकत्रित येत त्या गव्याच्या कळपाला तेथून सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत हुसकावून लावले. गेले दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव, निसर्गाचा लहरीपणा यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांवर गव्याच्या कळपाच्या रूपाने संकट येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हाता तोंडाला आलेले गव्हाचे पीक रानगवे तुडवत असल्यामुळे वन विभागाने त्यांचा बंदोबस्त करून परिसरात असणाऱ्या वस्तीला चेनलींगचे कुंपण घालावे, अशी मागणी या निमित्ताने उपस्थित होत आहे.