दैनिक स्थैर्य | दि. २४ जुलै २०२३ | फलटण |
कुरवली खुर्द (ता. फलटण) गावामध्ये दोन शाळकरी मुलींमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून भांडणातील दलित अल्पवयीन मुलगी व तिच्या आईचा मारहाण करून विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दलित महिला व तिच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर कुरवली खुर्द गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून गावात शांतता आहे.
या प्रकरणाची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कुरवली खुर्द (ता. फलटण) गावामध्ये रविवारी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास दोन शाळकरी मुलींमध्ये भांडण झाले. यातील एक मुलगी दलित कुटुंबातील आहे. या भांडणाच्या रागातून दुसर्या मुलीच्या कुटुंबातील लोकांनी ७.३० वाजता दलित अल्पवयीन मुलगी व तिच्या आईस हाताने मारहाण करून त्यांचा विनयभंग केला, अशी तक्रार पीडित दलित महिलेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांखाली आरोपी कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस करीत आहेत.
दरम्यान, घटनेच्या अनुषंगाने कुरवली खुर्द गावामध्ये शांतता असून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.