
दैनिक स्थैर्य । 10 जुलै 2025 । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटण येथील बी.एस.सी. कृषी पदवीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत दुग्धजन्य पदार्थ निर्मिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
यामध्ये शास्त्रीय पद्धतीने दुधापासून विविध पदार्थ तयार करणे, त्यासाठी आवश्यक साहित्य, यंत्रसामग्री, पदार्थानुसार पॅकेजिंगचे साहित्य, दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ ओळखणे, दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने, स्वच्छतेचे निकष, दुग्ध व्यवसायातील व्यवस्थापन, जमा खर्च व ताळेबंद, दुग्ध व्यवसायात येणार्या विविध अडचणी आणि त्यांचे निराकरण करणे, दुग्ध व्यवसाय केंद्रांना भेटी आयोजित करणे अशा विविध बाबींवर सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली.
विद्यार्थ्यांना दुग्धजन्य पदार्थ जसे की खवा, बासुंदी, रबडी, पनीर, गुलाबजामुन, दही, चक्का, श्रीखंड, छन्ना, रसगुल्ला, रसमलाई, लोणी, तूप, आईस्क्रीम, इत्यादी तयार केले जातात, अशा प्रकारे कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत दुग्ध व्यवसायाचे परिपूर्ण व्यावसायिक तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात स्वावलंबी कृषी उद्योजक व्हावे हा यामागील हेतू आहे.
या कौशल्य प्रशिक्षणाद्वारे फलटण पंचक्रोशीतील युवकांनी फायदा घेऊन दूध डेअरी, दूध संघ या ठिकाणी उपलब्ध होणार्या विविध नोकरीच्या संधींचा फायदा करून घेण्यात यावा. या व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. व्ही. कर्चे, सहायक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग आणि कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.