ग्रामीण भागात दुधाचा व्यवसाय अडचणीत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २६ : सध्या करोनाचा संसर्ग राज्याच्या सर्वच भागात सुरू आहे. करोनामुळे बहुतांशी शेतकर्‍यांचा रोजगार बुडाला आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा असलेला दुधाचा व्यवसायही अडचणीत सापडला आहे. दुधाला मागणी असूनही योग्य दर मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दुभत्या जनावरांचा चारा व पशुखाद्याचा वाढता खर्च भागवताना शेतकर्‍यांना कसरत करावी लागत आहे.

राज्यात सातारा जिल्हा दूध उत्पादनात अग्रेसर मानला जातो. परंतु येथील शेतकरी 4 महिन्यांपासून करोनामुळे विविध संकटांना तोंड देत पशुपालन करताना मेटाकुटीस आले आहेत. दुधाच्या समस्येने शेतकर्‍यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. माण तालुक्यातील गोंदवले, मार्डी, आंधळी, बिदाल, पळशी, मलवडी, म्हसवड, वरकुटे-मलवडी व राणंद या भागात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. परंतु गेल्या 4 महिन्यांपासून शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकर्‍यांना कोरोनाची झळ बसत आहे. सरकारने दूध उत्पादकांचे अतिरिक्त दूध खरेदी करण्याचे आश्‍वासन दिले असले तरी त्याचा थेट फायदा गावातील दूध उत्पादकापर्यंत पोहचत नाही. सहकारी खासगी दूध संघ या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून येते. अनेक खासगी दूध संघ आहेत. परंतु या दूध संघाकडून दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी भरडला जात आहे. पूर्वी गायीच्या दुधाचा 28 ते 30 रुपयांपर्यंत दर होता. परंतु तो दर आता 18 ते 20 रुपयांवर आला आहे.

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे व भाजप पक्ष हा विरोधी पक्ष म्हणून कार्यरत आहे. मात्र, माण तालुक्यात दुधाच्या दरासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार का, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष व महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन भाजपचे आ. जयकुमार गोरे पुढील काळात निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!