शिवसेनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवा – उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १4 जुलै २०२१ । सातारा । महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. शिवसेनेच्या कल्याणकारी योजना आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचवा असे आवाहन उच्च व तंत्रज्ञान व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर दि 12 ते 24 जुलै या दरम्यान शिव संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ मंगळवारी सातारा जिल्ह्यात येथील हॉटेल मानसी प्राईडच्या दालनामध्ये आयोजित कार्यक्रमात झाला . त्यावेळी ते बोलत होते.

ना. उदय सामंत पुढे म्हणाले, शिवसेनेने गेल्या पाच दशकाच्या वाटचालीत मराठी माणसाची अस्मिता जपत आपले राजकीय अस्तित्व वेळोवेळी दाखवून दिले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा शिवसेना आजही जपत असून सर्वसामान्य माणसांचे हित जपणे हाच विकासाचा खरा मंत्र आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवभोजन थाळी सारखे कौतुकास्पद उपक्रम लॉकडाऊनच्या काळात राबविले. पक्ष संघटनेची मजबुती व कार्यकर्ता सक्षमीकरणासाठी उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात सर्वत्र शिवसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. शासनाच्या योजना व पक्षाची उद्दिष्टे शिवसैनिकांनी जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात पोहचवयाची असून तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत शिवसैनिकांनी पोहचण्याचे आवाहन त्यांनी केले.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्हयात सेनेच्या संघटनीकरणासाठी सुरू झालेले शिव संपर्क अभियानात शिवसैनिक मनापासून सक्रीय राहतील. सेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला एकाकीपणा जाणवू देणार नाही. त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पक्षसंघटना ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिल अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली. कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी शिवसेनेची जिल्हयात ताकत वाढविण्यासाठी आम्ही कोठेही कमी पडणार नाही . सर्वसामान्य माणसाचे हित हा केंद्रबिंदू मानून पक्ष विस्तार आणि कार्यकर्ता सक्षमीकरणाचे व्यापक कार्यक्रम जोरदारपणे सुरु राहतील असे ठाम प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.
शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील म्हणाले, पक्ष विस्तार आणि संघटना बांधणी याचे पक्षीय आदेश वेळोवेळी अमलात आणले जात आहे. आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू असून यावेळी शिवसेना आपले अस्तित्व पूर्ण ताकतीने दाखवून दिले जाईल, असे प्रतिपादन नितीन बानुगडे यांनी केले.

शिव संपर्क अभियानाची अधिकृत घोषणा उदय सामंत यांनी केली. या योजनेचा जाहीरनामा यावेळी प्रसिद्ध करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव व यशवंत घाडगे यांनी केले. सूत्रसंचालन शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केले. महिला आघाडीच्या संघटिका शारदा जाधव, तालुकाप्रमुख दत्ता नलावडे, अनिल गुजर, सातारा शहर प्रमुख निलेश मोरे, उपशहरप्रमुख अभिजीत सपकाळ, नितेश गादे, विभागप्रमुख सुमित नाईक, महिला संघटक रूपाताई लेंभे आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!