दैनिक स्थैर्य । दि.१८ फेब्रुवारी २०२१ । माण । कुळकजाई ता. माण येथील सालाबादप्रमाणे खंडोबा देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त प्रशासनाची परवानगी न घेता बैलगाडी शर्यत आयोजित करून गर्दी जमवून कोरोना अनुषंगाने नियमाचे उल्लंघन केल्याने दहिवडी पोलिसांनी यात्रा कमिटीमधील विक्रम गणपती जगताप, नारायण नाना पोतेकर, छगन काशिनाथ पांडेकर, अशोक शिवाजी पोतेकर यांचे विरुद्ध दहिवडी पोलीस ठाणे मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर यात्रेत करमणूकीचे कार्यक्रम आयोजित करत असताना यात्रा कमिटीने दहिवडी पोलीस स्टेशनकडून कोणतीही रीतसर परवानगी घेतली गेली नाही. बैलगाडी शर्यतीला जरी शासनाने परवानगी दिली असली तरी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. जरी यात्रा कमिटी परवानगी घेण्यासाठी आले असता तरी देखील परवानगी मिळाली नसती करणार कोरोनाच्या अनुषंगाने अजूनही यात्रा कालावधीमध्ये जमावबंदी आदेश माण तहसीलदार यांनी लागू केला आहे.
यात्रा कालावधीमध्ये जमाव होऊ नये, असे कार्यक्रम घेण्यास बंदी असताना देखील शासनाचे सर्व आदेश जुगारून यात्रा कमिटीने बैलगाडी शर्यत आयोजित करून जमाव जमविल्याची गोपनीय माहिती दहिवडी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांना मिळाल्याने त्याबाबत गोपनीय विभागाचे पोलीस नाईक प्रकाश इंदलकर व पोलीस नाईक विशाल वाघमारे यांनी सदर ठिकाणी समक्ष जाऊन खात्री करून कुळकजाई यात्रा कमिटी मधील सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस नाईक विशाल वाघमारे करत आहेत.