
स्थैर्य, फलटण, दि. 24 ऑगस्ट : ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात आणि पारंपरिक उत्साहात फलटण येथील आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट रोजी दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा, मनमोहक नृत्य सादरीकरण आणि गोविंदा पथकांमधील चुरस यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गोल्डन ड्रीमस् एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. वैशाली शिंदे यांच्या हस्ते दहीहंडी पूजनाने झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अंकिता शर्मा उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नर्सरी ते इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. धोतर-कुर्ता आणि लेहंगा-चोळी अशा पारंपरिक वेशभूषेतील राधा-कृष्णाच्या रूपातील बालविद्यार्थी सर्वांचे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमाचा मुख्य भाग असलेल्या दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेत शाळेच्या रेड, ग्रीन, ब्ल्यू आणि यलो या चारही हाऊसच्या गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळाली. अखेर, चिठ्ठीद्वारे मिळालेल्या पहिल्या संधीचे सोने करत ‘यलो हाऊस’च्या गोविंदांनी एकजुटीने मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडली आणि पहिला मान पटकावला.
या यशस्वी कार्यक्रमाचे श्रेय डॉ. वैशाली शिंदे यांच्या कुशल मार्गदर्शनाला जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेत केवळ शैक्षणिकच नव्हे, तर सांस्कृतिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. “एकत्रितपणे कार्य केल्यास कोणतीही उंची गाठता येते” हा दहीहंडीचा संदेश या उत्सवातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला, ज्यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.