माणदेशी सुपुत्राचा ‘थर’च्या वाळवंटात ‘थरार’; दादासो सत्रे यांची १०० किमीची विक्रमी धाव


जैसलमेर ते लोंगेवाला अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये पटकावले चौथे स्थान; १९७१ च्या युद्धातील वीरांना अनोखी मानवंदना.

स्थैर्य, फलटण, दि. २९ डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ आणि लडाखची ‘खारदुंगला’ सर केल्यानंतर, माणदेशी सुपुत्र आणि तोंडले (ता. फलटण) गावचे सुपुत्र दादासो सत्रे यांनी आता राजस्थानच्या थर वाळवंटात आपल्या जिद्दीचा झेंडा रोवला आहे. ‘द हेल रेस’ (The Hell Race) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बॉर्डर अल्ट्रा’ स्पर्धेत त्यांनी १०० किलोमीटरचे अंतर अवघ्या १० तास २५ मिनिटांत पूर्ण करून संपूर्ण भारतीय धावकांमध्ये चौथे स्थान पटकावण्याचा बहुमान मिळवला आहे.

‘द हेल रेस’: निसर्गाशी आणि मनाशी संघर्ष

राजस्थानमधील जैसलमेर ते लोंगेवाला या मार्गावर होणारी ही स्पर्धा अत्यंत खडतर मानली जाते. स्पर्धेची सुरुवात दुपारी १२ वाजता भर उन्हात (२५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान) होते, तर रात्री हाडे गोठवणारी थंडी असते. अशा परस्परविरोधी हवामानात धावणे हे मोठे आव्हान असते. त्यातच दर १० किलोमीटरवर केवळ पाणी (हायड्रेशन पॉईंट) मिळते. त्यामुळे खाण्याचे साहित्य आणि पाणी स्वतःच्या पाठीवर घेऊन, कोणाचीही बाहेरील मदत न घेता हे अंतर पूर्ण करावे लागते. बाहेरील मदत घेतल्यास स्पर्धेतून बाद केले जाते. अशा कठोर नियमांच्या आणि निसर्गाच्या आव्हानावर मात करत दादासो सत्रे यांनी हे यश मिळवले आहे.

१९७१ च्या रणभूमीला सलाम

ही स्पर्धा केवळ धावणे नसून इतिहासाला दिलेली मानवंदना आहे. ४ डिसेंबर १९७१ रोजी याच लोंगेवाला चौकीवर भारताच्या १२० शूर जवानांनी पाकिस्तानच्या ३ ते ४ हजार सैनिकांना आणि रणगाड्यांना धूळ चारली होती. धैर्याची आणि बलिदानाची व्याख्या ठरलेल्या या ऐतिहासिक रणभूमीला सलाम करण्यासाठी दादासो सत्रे यांनी ही १०० किमीची दौड पूर्ण केली.

‘स्थैर्य’शी बोलताना भावना व्यक्त

या यशानंतर ‘दैनिक स्थैर्य’शी बोलताना दादासो सत्रे म्हणाले, “माझ्यासाठी हा प्रवास केवळ एका शर्यतीपेक्षा सहनशक्ती, शिस्त, संयम आणि मानसिक शक्तीची खरी परीक्षा होती. प्रत्येक किलोमीटरने माझ्यातील मर्यादा ओळखल्या. भर उन्हात धावताना शरीरातून पडणाऱ्या प्रत्येक घामाच्या थेंबाने देशसेवेसाठी लढलेल्या जवानांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची आठवण करून दिली. काळोख्या रात्रीने माझे धैर्य जागृत ठेवले.”

यशाची परंपरा कायम

दादासो सत्रे यांनी यापूर्वी साऊथ आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन, लडाखमधील खारदुंगला अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केली असून, त्यांना प्रतिष्ठित ‘आऊट स्टँडिंग रनर ऑफ द इयर’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या नव्या विक्रमामुळे फलटण आणि माणदेशच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.


Back to top button
Don`t copy text!