प्रभाग ११ मध्ये दादासाहेब चोरमले मैदानात; राजे गटाचे पारडे जड ?


स्थैर्य, फलटण, दि. १९ नोव्हेंबर : फलटण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ ची लढत चर्चेत आली आहे. या प्रभागातून शिवसेनेच्या (धनुष्यबाण) चिन्हावर कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले हे निवडणूक लढवत आहेत. दादासाहेब चोरमले हे सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व तर आहेतच, शिवाय राजकारणातील परखड आणि स्पष्टवक्ते व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग ११ मध्ये उत्साह संचारला आहे.

दादासाहेब चोरमले हे विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वीही फलटण शहराच्या विकासात सक्रिय योगदान दिलेले आहे. त्यांच्या अनुभवामुळे आणि सामाजिक कार्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. या अनुभवाच्या जोरावर आणि ‘राजे गटा’च्या ताकदीने ते मतदारांना साद घालत आहेत.

सध्या निवडणुकीचे वातावरण ढवळून निघत असताना, दादासाहेब चोरमले अत्यंत आत्मविश्वासाने आपली भूमिका मांडत आहेत. ते सांगतात की, नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर या युवा नेतृत्त्वावर फलटण शहरातील नागरिक पुन्हा विश्वास ठेवतील आणि पालिकेची सत्ता ‘राजे गटा’कडेच देतील. विकासाची गती कायम ठेवण्यासाठी जनतेने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’ला साथ द्यावी, असे आवाहन ते करत आहेत.

प्रभाग ११ मध्ये दादासाहेब चोरमले यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीचे संदीप चोरमले यांचे कडवे आव्हान आहे. ही लढत चुरशीची असली तरी, दादासाहेब चोरमले यांचे स्वतःचे वेगळे कार्य, नेतृत्त्वगुण आणि परखड छाप मतदारांमध्ये कशी प्रभावी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अनुभवी आणि स्पष्टवक्ते नेतृत्व म्हणून दादासाहेब चोरमले या निवडणुकीत मोठा विजय मिळवणार, असा विश्वास ‘राजे गटा’चे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

 


Back to top button
Don`t copy text!