दैनिक स्थैर्य । दि.०८ जानेवारी २०२२ । सातारा । डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असलेल्या सातारा नगरपालिकेने यापूर्वी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार्या महनीय व्यक्तींना डॉ. दाभोळकर पुरस्काराने गौरवले आहे. सातारा नगरपालिकेने यावर्षी या पुरस्कारासाठी आमच्या ‘नाम’ फौंडेशनची निवड केली, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. नाम फौंडेशनसाठी महाराष्ट्रात तळागाळापर्यंत काम करत असलेल्या कार्यकर्त्यांची या पुरस्कारामुळे ऊर्जा वाढणार आहे, अशा शब्दात प्रख्यात अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते व नाम फौंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी पुरस्काराविषयी गौरवोद्गार काढले.
सातारा नगरपालिकेच्यावतीने संपूर्ण देशभरात अलौकीक कार्य करत असलेल्या व्यक्तींना डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती सामाजिक पुरस्काराने गौरवले जाते. यावर्षी ‘नाम’ फौंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सातार्याच्या शाहू कलामंदिरात अत्यंत देखण्या सोहळ्यात सातारकरांच्या साक्षीने नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना पुरस्कार देण्याची सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची इच्छा होती. मात्र, कोरोनाचे निर्बंध सातारा जिल्ह्यात लादले गेल्याने 50 माणसांच्या उपस्थितीतच कोणताही कार्यक्रम घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे हे दोघेही खास सेलिब्रेटी असल्याने सातार्यात ते आले तर गर्दी प्रचंड उसळणार, त्यामुळे कोरोनाचा धोकाही गर्दीमुळे वाढणार हे लक्षात घेवून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व नगरपालिकेचे प्रशासक अभिजीत बापट यांच्यामध्ये चर्चा झाली आणि पुरस्कार निवड समितीच्या उपस्थितीत नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना पुरस्कार देण्याचा निर्णय झाला. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी स्वत: नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना फोन करुन नाम फौंडेशनच्या पुण्यातील कार्यालयात पुरस्कार निवड समितीच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्याची विनंती केली. त्यानुसार शुक्रवारी नाम फौंडेशनच्या कार्यालयात अवघ्या 15 लोकांच्या उपस्थितीत पुरस्कार निवड समितीच्यावतीने, सातारा नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या हस्ते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना डॉ. नरेंद्र दाभोळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1 लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सातारी कंदी पेढे, मानपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, सातारा विकास आघाडीचे पक्ष प्रतोद अॅड. डी. जी. बनकर, पुरस्कार निवड समितीचे सदस्य, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर, गणेश थोरात यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, केवढा इतिहास आहे रे सातार्याला. निसर्गाने नटलेला सातारा हा माझा जिल्हा आहे. मला ऐकून खूप छान वाटलं. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अनेक महत्वकांक्षी योजना सातार्यात पूर्णत्वाला नेल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातार्याला मोठे महत्व आहे. सातार्यात यावसं वाटतं. उदयनराजेंची आणि माझी जुनी मैत्री आहे. खूप महत्वकांक्षी व व्हिजन असलेले लिडर आहेत उदयनराजे. सातार्याने खरे तर उदयनराजेंना जपले पाहिजे, असे आवाहनही नाना पाटेकर यांनी केले.
मला यायचं होतं रे सातार्यात. सातारकरांंशी बोलायचं होते. उदयनराजेंच्या व्हिजनबद्दल सांगायचे होते. पण कोरोनामुळे अनेक निर्बंध आलेत, असे नमूद करुन नाना पाटेकर पुढे म्हणाले, सातार्याचा आणखी विकास व्हायला हवा. विशेषत: औद्योगिकरणामध्ये सातारा पुढे जायला हवा. मी आत्ताच डी. जी. बनकर व अभिजीत बापट यांच्याकडून सातारा नगरपालिकेने सातार्यात काय काय केले हे ऐकलं. आयुर्वेदिक गार्डन सातार्यात असेल तर याच्यासारखी दुसरी मोठी गोष्ट नाही. मला सातार्यात खरं भेटायला यायचं आहे. हे सगळं जवळून पहायचं आहे. सातारा नगरपालिकेने यापूर्वी केवढ्या मोठ्या माणसांना पुरस्कार दिलेत. गुणांची व परिश्रमाची कदर करणारी ही तुमची माती आहे. या नामावलीत नाम फौंडेशनचा तुम्हाला समावेश करावासा वाटला, हे माझ्या व मकरंदसाठी फार मोठे आहे. मात्र, तुम्हाला खरं सांगतो, हा पुरस्कार महाराष्ट्रामध्ये नाम फौंडेशनचे काम करत असणार्या, श्रम करत असणार्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. मी आणि मकरंद फक्त चेहरे आहोत. हे शाल, श्रीफळही त्यांचे आहे. तुम्हाला आमच्या कामाची नोंद घ्यावीशी वाटली यातच उदयनराजेंचा मोठेपणा शोभतो, अशा शब्दात नाना पाटेकर यांनी उदयनराजेंचा गौरव केला.
मकरंद अनासपुरे म्हणाले, सातारा नगरपालिकेने दिलेला हा पुरस्कार नाम फौेंडेशनसाठी अभिमानास्पद आहे. सातारा नगरपालिकेने स्वच्छतेच्या व पर्यावरणाच्या बाबतीत देशात सातार्याचे नाव मोठे केले आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहराचीच नव्हे तर सातारा जिल्ह्याची वाटचाल अत्यंत गौरवशाली होत आहे. कचरा निर्मूलन, पर्यावरण, वृक्ष लागवड या क्षेत्रात सातार्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. सातार्याचा औद्योगिक विस्तार झाला पाहिजे, यासाठी उदयनराजेंनी प्रयत्न करावे. नाना पाटेकर व मी नाम फौंडेशनच्या माध्यमातून सातार्याला मदत करायला तयार आहोत, अशी ग्वाहीही मकरंद अनासपुरे यांनी दिली.
प्रास्ताविकात निवड समितीच्यावतीने विनोद कुलकर्णी म्हणाले, सातारा जिल्ह्याला विशेषत: सातारा शहराला ऐतिहासिक वारसा आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करणारे सातार्याचे भूषण डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निधनानंतर सातारा नगरपालिकेच्यावतीने सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरी करत असलेल्या व्यक्ती व संस्थांना आम्ही डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती सामाजिक पुरस्काराने गौरवतो. यापूर्वी डॉ. अभय बंग, प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नाम फौंडेशनने आत्महत्याग्रस्त शेतकर्यांसाठी, जलसंधारणासाठी, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागासाठी केलेल्या कामाची दखल म्हणून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार नाम फौंडेशनची या पुरस्कारासाठी निवड केली. अलोट गर्दीत होणारा हा कार्यक्रम आम्हाला कोरोनामुळे निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत करावा लागत आहे. मात्र, हा पुरस्कार तुम्हाला देताना आम्हालाही अभिमान वाटत आहे. ग्लॅमर सोडून सेलिबे्रटी असतानाही तुम्ही साधेपणाने करत असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आहात, हेच तुमच्या सामाजिक उत्तरदायीत्वाचे मोठेपण आहे, अशा शब्दात कुलकर्णी यांनी पाटेकर व अनासपुरे यांचा गौरव केला.
अॅड. डी. जी. बनकर म्हणाले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा नगरपालिकेने संपूर्ण देशात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अत्यंत व्हिजन असलेला नेता व कार्यकर्त्यांसाठी वेळ देणारा समाजशील लिडर सातार्याला लाभल्याने आम्ही सातारा नगरपालिकेमार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजना यशस्वी करु शकलो. कास धरणाची उंची वाढवली असून सातार्यामध्ये सुसज्ज प्रशासकीय इमारत होत आहे. भुयारी गटर योजना, ग्रेडसेपरेटर, आयुर्वेदिक गार्डन, कचरा कुंडीमुक्त सातारा, आरोग्य सुविधांनी परिपूर्ण सातारा अशा वैविध्यपूर्ण योजनांमुळे सातार्याचा नावलौकिक उदयनराजेंनी व सातारा विकास आघाडीने वाढवला आहे. बनकर यांच्या या विधानावर नाना पाटेकर यांनी त्यांची पाठ थोपटली. दरम्यान, हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी डॉ. अविनाश पोळ व राजू सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल अॅड. डी. जी. बनकर यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत बापट यांनी सातारा नगरपालिका करत असलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमांची माहिती नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना दिली. यावेळी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फौंडेशनच्यावतीने अखिल भारतीय साहित्य महामंडळावर विश्वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल विनोद कुलकर्णी यांचा तर सातारा जिल्हा पत्रकारितेत सामाजिक कार्य करत असल्याबद्दल हरीष पाटणे यांचा नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी स्वत:हून सत्कार केला.
रखडलेला पुरस्कार मनोज शेंडेंच्यामुळे मार्गी…
नरेंद्र दाभोळकर पुरस्कार रखडले होते. मागचे तीन उपनगराध्यक्ष यांच्या कार्यकाळात फक्त एकच पुरस्कार दिला गेला होता. त्यामुळे उर्वरित पुरस्कार देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. मात्र, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी उर्वरित काळातील सर्व पुरस्कार देण्याचा शब्द सातारकरांना दिला होता आणि तो त्यांनी पाळलाही. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फौंडेशनला आणि उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कल्याणी यांना पुरस्कार जाहीर करुन त्यांनी आघाडी घेतली. आणखी दोन पुरस्कार त्यांनी अंतिम केले आहेत. पुरस्कार स्वीकारणार्यांचा होकार आल्यानंतर ते पुरस्कारही जाहीर केले जातील, अशी माहिती मनोज शेंडे यांनी नाना पाटेकर यांना दिली.
नाना पाटेकर यांनी उडवली उदयनराजेंसारखी कॉलर
पुरस्कार वितरणप्रसंगी नाना पाटेकर कमालीचे मूडमध्ये होते. त्यांनी अनेकांची मिमिक्री केली. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से त्यांनी पुरस्कार निवड समितीच्या सदस्यांना सांगितलेेे. उदयनराजेंचेच डायलॉग नाना पाटेकर यांनी मारले. सरतेशेवटी उदयनराजेंसारखीच कॉलर उडवून ‘स्टाईल इज स्टाईल’ असे म्हणत नाना पाटेकर यांनी ‘मजा आली असती रे सातार्यात आलो असतो तर’, असे म्हणत मकरंद अनासपुरे यांना टाळी दिली. नानांच्या उदयनराजे स्टाईलला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली.