डी.पी. चोरणारी टोळी गजाआड; फलटण ग्रामीण पोलिसांची दमदार कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ जुलै २०२३ | फलटण |
फलटण ग्रामीण पोलिसांनी फलटण तालुक्यासह आसपासच्या तालुक्यात महावितरणची डी.पी. चोरणारी टोळी जेरबंद केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी विविध ठिकाणी केलेले १८ गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून ८,८०,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीतील एकूण तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणाची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत महावितरणच्या डी.पी. चोरीच्या गुन्ह्यांनी डोके वर काढले होते. या डी.पी. चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक तयार करण्यात आले होते.

या विशेष पथकाने तपास करून आरोपी संतोष जगन्नाथ घाडगे, सागर युवराज घाडगे, किरण भीमराव घाडगे (सर्व रा. मलटण, ता. फलटण) व त्यांच्या इतर साथीदारांनी डी.पीं.ची चोरी केल्याची माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कसूर तपास केल्यानंतर फलटण तालुका, वाठार पोलीस ठाणे व लोणंद पोलीस ठाणे व फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील डी.पीं.ची चोरी केली असल्याची कबुली दिली.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून विविध ठिकाणी चोरी केलेले सुमारे ३,८०,००० रूपये किमतीचे एकूण ३८० किलो वजनाचे तांबे व चोरी करण्यास वापरलेले वाहन ओमनी कार असा एकूण ८,८०,००० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व पो.नि. सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.उपनिरीक्षक सागर अरगडे, स.पो. उपनिरीक्षक मोहन हांगे, पो.ह. अरुण शेंडे, महादेव पिसे, पो.ना. नितीन चतुरे, अमोल जगदाळे, तुषार आडके, पो.कॉ. विक्रम कुंभार, तुषार नलवडे, हनुमंत दडस, श्रीकांत खरात यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!