दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑक्टोबर २०२२ । सातारा । जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व बाल न्याय मंडळ व बाल समिती, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अनुरक्षण संघटना संच मुलामुलींचे निरीक्षणगृह, सातारा येथील अनाथ, निराश्रीत, एक पालक असलेली बालके, विधी संघर्षग्रस्त काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुला मुलींनी दिपावली निमित्त स्वत: तयार केलेल्या छोटे मोठे आकाश कंदील, रंगीबेरंगी पणत्या, उटणे, शोभेच्या वस्तू यांचे प्रदर्शन व विक्री दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी सुरु करण्यात आली असून हे प्रदर्शन व विक्री दि. 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्हि.ए.तावरे यांनी दिली.
यावेळी बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष न्या. श्री. सावरकर, संस्थेचे अध्यक्ष बेगमपूरे, जिल्हा परिविक्षा अधिकारी ए.बी. शिंदे, बाल कल्याण समितीचे सचिव प्रदीप साबळे, सदस्य जयदीप पाटील, सदस्या शितल लोखंडे, बालगृहाच्या अधिक्षिका संजीवनी राठोड, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख व जिल्हा व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रोटरी क्लब यांच्यामार्फत संस्थेतील मुला मुलींना मोठे आकाश कंदील तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले, इनरव्हिल क्लब, सातारा यांच्यामार्फत संस्थेतील मुला मुलींना रंगीबेरंगी पणत्या व आकर्षक वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी मुला मुलींना छोटे आकाश कंदील व उटणे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्हि.ए.तावरे यांनी केले आहे.