दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२१ | फलटण | शहरातून जाणाऱ्या फलटण – सातारा मार्गावरील अत्यंत गजबजलेल्या रिंग रोड परिसरातील मुख्य चौक डी. एड. चौक येथे सोमवारी दि. ८ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ऊसाने भरलेली ट्रॉली ट्रॅक्टरला जोडून ऊस वाहतूक सुरु असताना ट्राॅलीचे लॉक तुटल्याने उतारावरुन ऊसाने भरलेली ट्रॉली भरधाव वेगात मागे येत असताना सर्वांनी आता काय अनर्थ होणार अशी भिती व्यक्त करीत अक्षरशः श्वास रोखून धरले, मात्र सुदैवाने कोणताही मोठा अनर्थ घडला नाही. सदरच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.
सोमवार दि. ८ रोजी रात्री ८ ते ८.१५ वाजण्याच्या सुमारास डी. एड. चौक फलटण येथे ऊसाची ट्रॅक्टर ट्राॅलीद्वारे वाहतूक सुरु असताना ट्रॅक्टरला जोडलेली ट्राॅलीचे लॉक तुटल्याने चढावरुन ट्रॉली पाठीमागे सरकत येवून डिव्हायडरला धडकून उभी राहिल्याने मोठा अनर्थ टळला, ट्रॉली मागे येत असताना लोकांनी केलेल्या आरडा ओर्डीमुळे रस्त्यावरुन येणारी दुचाकी/चारचाकी वाहने, शहरवासीय नागरिकांनी सावधानतेने बाजूला होऊन दुर्घटनेतून वाचण्यासाठी सावध पवित्रा घेतला मात्र सदर ट्रॉली डिव्हायडरला धडकून थांबल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
फलटण तालुक्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले असल्याने ट्रक व टॅक्टरद्वारे ऊस वाहतूक सुरु आहे. ट्रक व ट्रॅक्टर ट्राॅलीद्वारे ऊस वाहतूक सुरु असताना संबंधीतांनी योग्य खबरदारी घेऊन वाहतुकीचे नियम, निकष सांभाळून वाहतूक करण्याची आवश्यकता आहे. प्रामुख्याने ऊस वाहतुकीची सर्व वाहने सुस्थितीत असावीत, विशेषतः त्याचे टायर, ब्रेक व्यवस्थित असल्याची खात्री मालकाने केली पाहिजे. सदर वाहनांवरील चालक पूर्णतः प्रशिक्षीत असला पाहिजे, त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना असलाच पाहिजे, त्याला ट्रॅक्टर चालविताना वाहतुकीचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या पाहिजेत, विशेषतः या वाहनावर मोठ्या आवाजात गाणी लावून त्याच्या तालावर आपले ताब्यातील वाहन चालविणे बेकायदेशीर असल्याचे समजावून देण्याची आवश्यकता असल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती.
लॉक तुटल्याने ऊसाने भरलेली ट्रॉली उतारावरुन मागे येत असताना काही नागरीक ऊसाने भरलेली ट्राॅली मागे येत असल्याचे पाहून ओरडून रस्त्यावरील वाहन चालक, पादचारी, दुकानदार वगैरे सर्वांना सूचना देत।असल्याने लोक सावध होऊन रस्त्यावरुन वाहनांसह बाजूला झाले होते, मात्र १०/१५ सेकंदात ट्राॅली मागे सरकत येवून डिव्हायडरला धडकून थांबली. यामध्ये कोणतीही अप्रिय घटना घटना घडली नाही मात्र नागरीकांची धाकधूक वाढली होती.
फलटण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देवून वाहतूकीला अडथळा होणार नाही यासाठी प्रयत्न केले.