स्थैर्य, पंढरपूर, दि.६: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोचार्नं ७
नोव्हेंबरला पंढरपुरातून आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. मात्र, या
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 6
नोव्हेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 7 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत
पंढरपूरमध्ये संचारबंदीचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. संचारबंदी
काळात पंढरपूर शहरात 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई
करण्यात आली आहे. त्याचबरोबर पंढरपूर शहराकडे जाणा-या सर्व बसेस बंद
राहणार आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आक्रोश आंदोलनात गर्दी होण्याची
शक्यता असल्याने जिल्हाधिका-यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत.
मराठा क्रांती मोर्चाकडून पंढरपूर ते
मंत्रालय असा पायी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. पण कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांकडून पंढरपूर शहरात संचारबंदी लागू करण्यात
आली आहे. महाद्वार घाट ते नामदेव पायरी परिसर, चौफळा ते पश्चिम द्वार
परिसर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रदक्षिणा मार्ग, अशा अनेक ठिकाणी संचारबंदी
लागू करण्यात आली आहे. आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक काय भूमिका
घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.