पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती; कोरोना प्रतिबंधासाठी आढावा बैठक
स्थैर्य, सोलापूर, दि. 26 : सोलापूर शहरात यापुढे संचारबंदी लागू केली जाणार नाही. मात्र बार्शी शहर आणि तालुक्यातील परिस्थिती पाहता तिथे येत्या 31 जुलै पर्यंत संचारबंदी लागू केली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीस जिल्हापरिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर आदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
बैठकीत लॉकडाऊनच्या कालावधीत करण्यात आलेल्या चाचण्या आणि त्यातुन निष्पण्ण् झालेले कोरोना बाधित रुग्ण, त्यांच्यावर केले जाणारे उपचार, कायदा आणि सुव्यवस्था स्थिती, कोरोनासाठी आवश्यक असणारा निधी याबाबत सविस्तर चर्चा झाली.
भरणे यांनी सांगितले, ‘कोरोना चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे उपचाराची क्षमताही वाढवावी लागणार आहे. त्यासाठी डेडिकेटेड कोविड सेंटर, कोविड हॉस्पिटल यांची संख्या वाढवावी लागेल. यासाठी राज्यशासनाकडून निधी मागणीचा प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने तत्काळ सादर करावा’.
त्यांनी सांगितले, ‘लॉकडाऊनच्या कालावधीत शहर आणि जिल्ह्यात सुमारे वीस हजार रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये 1584 कोरोना बाधित रुग्ण असल्याचे आढळले. या लोकांना अलगीकरण करुन उपचार सुरु करण्यात आले. टेस्टींगची वाढवलेली क्षमता लक्षात घेऊन ट्रीटमेंटची क्षमताही वाढविण्यासाठी प्रयत्न केले गेले. शहर, जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंटरची क्षमता वाढविण्यात आली.’
गंभीर रुग्णांवर नामवंत डॉक्टरांकडून उपचार करता यावे यासाठी टेलि-आयसीयु प्रणाली सुरु करण्यात आली आहे. यामुळे सोलापूर मधील गंभीर रुग्णांवर उपचारासाठी मुंबई, पुणे येथील डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो. यासाठी आवश्यक असणाऱ्या हायस्पीड डाटा लाईनची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
बैठकीस पोलिस उपायुक्त बापू बांगर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, डॉ.प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे यांनी सोलापूरकरांचे मानले आभार
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जाहिर करण्यात आलेला लॉकडाऊनच्या काळात सोलापूरच्या नागरिकांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केले याबद्दल पालकमंत्री भरणे यांनी सोलापूरकरांचे आभार मानले. नागरिकांनी गेल्या दहा दिवसात प्रशासनाच्या सर्व सूचनांचे अतिशय काटेकोरपणे पालन केले. भविष्यातही सोलापूरच्या नागरिकांनी प्रशासनाला, महानगरपालिका, पोलिसांना अशा प्रकारे सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचबरोबर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत, फिजिकल डिस्टन्स पाळावे, गर्दीमध्ये जाणे टाळावे, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.