हर बिमारीपर अक्सीर इलाज! कुबेर मल्हम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


राहुल गांधींचा जो काही खुळेपणा वा निर्बुद्धता असेल, ती त्यांची उपजत गुणवत्ता आहे. त्यांना ती आत्मसात करावी लागलेली नाही. म्हणूनच अनेकदा त्यांच्याकडून काही चुकीची विधाने झाली, तरी ती गैरलागू वाटत नाहीत. पण लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी निर्बुद्धता आत्मसात केलेली वा कमावलेली असल्याने त्यांची दखल घ्यावी लागते. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘पाणउतारा करावा इतकेही कुबेर महत्वाचे नाहीत. पण वाचकासमोर सुबुद्धतेतील निर्बुद्धता अधिरेखित करण्यासाठी’ कुबेरांची दखल घ्यावी लागते. त्यांनी गिधाडगौरव नावाचे जे आख्यान लावलेले आहे, त्यातली निर्बुद्धता प्रत्यक्ष मुर्खपणाशीही ‘सामना’ करू शकणारी नाही. अन्यथा आपण चाकरीचा पट्टा गळ्यात अडकवलेला असताना दुसर्‍यावर त्याच कारणास्तव भुंकू नये; इतके तरी भान राखले जाऊ शकते ना? कुबेरांना त्याचेही भान उरलेले नाही. तुषार मेहता हे भारत सरकारचे वकील वा सॉलिसीटर जनरल आहेत आणि ज्याअर्थी ते सरकारची बाजू मांडण्यासाठीच न्यायालयात उभे रहातात, तेव्हा त्यांना कुबेरांच्या महान अकलेचे दाखले देण्याची मुभा नसते. हे रस्त्यावरल्या शेंबड्या पोरालाही कळू शकते. पण कुबेरांना कळू शकणार नाही. कारण त्यांनी आपले नाक कधी गळू नये तितकी काळजी घेतलेली असावी. मग त्यांना सामान्य सत्य कसे कळावे? आपल्या प्रकाशन संस्थेचा मालक किती आर्थिक भानगडी करतो वा कोणत्या अफ़रातफ़री करतो, त्याचे पाढे कुबेरांनी कधी वाचलेत काय? असतील तर जरूर सांगावेत. मग इतरांचा चाकरी करणारे म्हणून हिणवायला अजिबात फ़रकत नाही. आपली बुद्धी सरकारी चाकरीत रुजू करताना आपण स्वयंपुर्ण बुद्धीचे प्रवक्ते असल्याचा डंका मेहतांनी पिटलेला नाही. कुबेर मात्र कंबरड्यात लाथ बसूनही मालकाचे चरणतीर्थ घेत चाकरीत टिकून राहिलेले आहेत.

याआधी रोहटगी किंवा अनेक सरकारी वकीलांनी आपले पटले नाहीतर आपल्या पदाचा राजिनामा दिलेला आहे. तितकी हिंमत ते दाखवू शकतात, कारण स्वयंभूपणे आपला वकीली व्यवसाय करण्याची क्षमता त्यांच्या बुद्धीत आहे. पण कुबेरांना मालकाने हाकलून लावले, तर खायचे काय याची भ्रांत पडणार आहे. म्हणूनच हे ‘असंतांचे संत’ मालकाने मान मुरगळली वा लेखणीवरून झाडू फ़िरवली; तरी मीठाला जागून चाकरी करीत असतात. मेहता वा तत्सम लोकांच्या पंगतीत जाऊन बसण्याची पात्रता त्यांना मिळवता आलेली नाही. मीठाला जागताना मालकाच्या इशार्‍यावर ठराविक लोकांवर भुंकण्याची ड्युटी करावी लागते. बदल्यात आपल्याही काही शत्रूंवर भुंकण्याचे स्वातंत्र्य मिळते; त्यावर समाधानी असलेल्यांची कहाणी म्हणजे कुबेरांची श्रीमंती आहे. अन्यथा त्यांना तुषार मेहतांचा सुप्रिम कोर्टातला युक्तीवाद इतका कशाला झोंबला असता? मेहतांनी कुबेरांच्या दुखण्यावर नेमके बोट ठेवलेले आहे. जणू अशा दिवट्यांनी स्थलांतरीत मजूरांच्या समस्या मांडल्या म्हणून केंद्र सरकार जागे झाले असला जावई शोध कुबेरांनी लावला आहे. अवघ्या तीन तासात लॉकडाऊन केल्याने लोक असतील तिथे अडकून पडले, असाही शोध आहे. पण अन्यथा जणू स्थलांतरीताचा प्रश्नच उदभवला नसता, असा आईनस्टाईनलाही मान खाली घालायला लावणारा वैज्ञानिक शोध कुबेरांनी लावला आहे. जितक्या संख्येने स्थलांतरीत मजूरांचे पलायन झाले, तितक्या मजूरांना आधी मुदत देऊन नंतर लॉकडाऊन जाहिर करायला हवा होता; असा राहुलशोध त्यांनी लावला आहे. समजा त्यात तथ्य असते तर काय झाले असते? कधी लॉकडाऊन लावता आला असता? किती दिवसांची मुदत दिल्यावर ही तारांबळ उडाली नसती? त्याचाही तपशील ह्या कुबेर मजकुरांनी द्यायला हवा ना?

किमान चार हजाराहून अधिक रेलगाड्या सोडल्या गेल्या आणि हजारो बसेस व ट्रक अशा मार्गाने दोनतीन कोटी लोक परप्रांत सोडुन आपापल्या राज्यात पोहोचले आहेत. त्यांना सुरळीत जायला द्यायचे तरी किमान आठदहा दिवस लॉकडाऊन घोषित करता आला नसता. म्हणजेच एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यासाठी थांबायला हवे होते; असाच कुबेरांचा सुर दिसतो. इतके दिवस थांबल्यानंतर अमेरिका किंवा कुबेरांच्या लाडक्या मायभूमी इटाली इत्यादी पाश्चात्य देशांचे काय झाले, ते जगासमोर आहे. त्यांना भले जन्मगावी जाण्यासाठी भारतीय मजूरांसारखी पळापळ करावी लागली नसेल. पण किडामुंगीसारखे मुडदे पडले आणि त्यांना खांदा द्यायला वा अंत्यविधीलाही माणसे मिळू शकलेली नाहीत. त्याला कुबेरनिती वा कुबेर पॉलिसी म्हणता येईल. माणसे मेली तरी बेहत्तर. त्यांना खांदा द्यायला कोणी नसला तरी चालेल. पण लॉकडाऊन होण्यापुर्वी आपल्या घरी पोहोचण्याची संधी द्यायला हवी. कोरोना काय कुबेरांनी अग्रलेख लिहीण्यापर्यंत ताटकळत थांबत असतो? त्याला कोणाला ग्रासण्याची घाई झालेली नाही. कोरोनासुद्धा कुबेरभक्त आहे. कोणालाही बाधा देण्यापुर्वी कोरोना कुबेरांचा अग्रलेख वाचतो आणि मगच आपल्या कामाला लागत असतो. मोदींनी परस्पर लॉकडाऊन घोषित करण्याची घाई करण्यापेक्षा एक वटहुकूम काढून कुबेरांना स्थानबद्ध करायला हवे होते? कुबेरांच्या अग्रलेखापासून कोरोनाला वंचित ठेवायचे धोरण स्विकारायला हवे होते? मग कोरोना त्रिशंकूसारखा अधांतरी लटकत राहिला असता आणि आरामात देशातले कोट्यवधी स्थलांतरीत मजूर मिळेल त्या वहानाने आपापल्या गावी वा राज्यात सुखरूप जाऊन पोहोचले असते. कदाचित कोरोना अन्य देशातील आपली कामगिरी करायलाही निघून गेला असता आणि इथे भारतात त्याला एकही बळी घेता आला नसता.

काल तर लोकसत्तेच्या एका कर्मचार्‍याकडून कुजबुज ऐकायला मिळाली. विवेक गोयंका यांना आजकालच्या एका जाहिरातीचा अनुभव घ्यावा लागला. कुठल्याशा मसाल्याची जाहिरात आहे. त्यात श्राद्ध चालले आहे आणि तिथे मांडलेल्या खाद्यपदार्थाचा वास घमघमलेला असतो. फ़ोटोतला मेलेला बाप हात जोडून बसलेल्या मुलाच्या कानशीलात आवाज काढतो. आपण जीवंत असताना आपल्याला असले चमचमीत पदार्थ कशाला खाऊ घातले नाही, असा जाब मृत बाप विचारतो. विवेक गोयंकाच्या कानशीलात म्हणे तिथे भिंतीवर असलेल्या छायाचित्रातल्या डॉ. अब्दुल कलामांनी सणसणित चपराक ठोकली. गाल चोळत विवेकने विचारले, की आपले काय चुकले? तर कलाम उत्तरले, माझ्या हयातीत लोकसत्तेत कुबेरला संपादक कशाला केलेले नव्हते? मला उगाच रॉकेटचा शोध घेत बसावे लागले नसते. छानपैकी विणावादन शिकण्यात व वाजवण्यात रमलो असतो. इथे स्वर्गात आल्यावरही मला अल्बर्ट, पाश्चर वा न्युटन यांच्याकडून चार शब्द ऐकावे लागले नसते. त्यांनाही वाटते. आयुष्य नसत्या फ़डतूस संशोधनात वाया घालवले. कुबेर तेव्हाच अग्रलेख लिहीत असते, तर वीजेचा शोध वा अन्य सर्व संशोधन परस्पर होऊन गेले असते. विज्ञान वगैरे विषय शाळेत शिकवावे लागले नसते. प्रयोगशाळा वा संशोधनावर इतका प्रचंड पैसा खर्चावा लागला नसता. त्यातून करोडो लोकांना राहुल गांधी थेट खात्यात पैसे जमा करू शकले असते. हा गुन्हा विवेक गोयंकाचाच नाही काय? त्याने कुबेरांना संपादक करण्याला विलंब लावला नसता, तर जगाला इतके हाल सोसावे लागले नसते आणि कोरोनाही जगभर बोकाळला नसता. नकारात्मकतेतील सकारात्मकता शोधण्याची किमया अन्य कुठल्या अव्वल शास्त्रज्ञाला आजवर साधली नाही, ते कुबेर एका अग्रलेखातून करू शकले, ह्या चमत्काराने जगभरच्या दिवंगत संशोधकांना आपल्या आयुष्यभराच्या विक्रमांचीही आता लाज वाटू लागली आहे.

आजचा नुसता अग्रलेखच कुबेरांनी दणक्यात लिहीलेला नाही. त्यांनी विज्ञानावरही अक्कल पाजळलेली आहे. ती बघून ट्रम्प यांना नासावर अधिक खर्च करू नये असे वाटले, तर बहुधा तिथल्या संशोधक वैज्ञानिकांवर बेकारीची पाळी येण्याची शक्यता जागतिक विज्ञान परिषदेनेही व्यक्त केल्याची बातमी आहे. खरेच मेक इन इंडिया वगैरे खेळत बसण्यापेक्षा मोदींनी कुबेरांच्या हाती कारभार सोपवला पाहिजे. अवघ्या जगाची अर्थव्यवस्था क्षणार्धात गर्तेतून बाहेर काढून सुपरसॉनिक वेगाने उंचावर घेऊन जाण्याची क्षमता कुबेरांच्या लेखणीत आहे. त्याला हवे तेवढे पाश्चात्य साहित्य व लेखन पुरवण्याचे काम भारत सरकारने करावे. बाकी कार्य सिद्धीस न्यायला कुबेर समर्थ आहेत. आणखी एक सांगायला हवे. हे लॉकडाऊन किंवा चाचण्या इस्पितळे उभारण्याचीही काही गरज नव्हती. उगाच पैशाची नासाडी झाली. त्यापेक्षा भारत सरकारने प्रत्येक भारतीयाला लोकसत्तेचा अग्रलेख मास्कप्रमाणे आपल्या तोंडावर लावून फ़िरायची सक्ती केली असती, तरी कोरोना झुरळासारखा पळून गेला असता. डॉक्टरांची संख्या कमी पडली नसती की तात्पुरती बेडव्यवस्था खडी करावी लागली नसती. लोकसत्तेच्या रद्दीचा मास्क बनवायचा आणि तोंडावर लावायचा. कोरोना गायब! भारतात अशा गुणी प्रतिभावान लोकांची कदरच होत नाही. तुषार मेहता यांच्यासारख्या प्रतिभाहीन लोकांना प्रतिष्ठा व पदे मिळतात. बिचार्‍या कुबेरांना लोकसत्तेत खितपत पडावे लागते. त्यामुळे करोडो लोकांना कोरोनाशी सामना करावा लागतो. लॉकडाऊनचा कोंडमारा सहन करावा लागतो. आपण सारे भारतीय कमालीचे दळभद्री आहोत. अर्थकारणापासून विज्ञानापर्यत सगळ्या समस्यांवरचा अक्सीर इलाज उपलब्ध असताना आपण मोदी, राहुल वा अमर्त्य सेन किंवा सोनिया गांधी असली फ़डतूस भांडणे करीत बसलो आहोत. अजून चिनच्या शी जिनपिंगचे लक्ष कुबेरांकडे कसे गेले नाही, याचेच आश्चर्य वाटते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!