स्थैर्य, फलटण, दि. ४ : करोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शासन/प्रशासनाच्या विविध निर्णयांची गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्यात पोलीस पाटील आघाडीवर असल्याचे नमूद करीत अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत काम करणाऱ्या फलटण तालुक्यातील पोलीस पाटलांची योग्य दखल घेऊन पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे काम कमिन्स फाऊंडेशनने केल्याचे गौरवोद्गार पोलीस पाटील संघटनेचे प. महाराष्ट्र उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर यांनी व्यक्त केले आहेत.
फलटण तालुक्यातील १२६ गावात सुमारे १०० पोलीस पाटील करोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी आपापल्या गावात अहोरात्र मेहनत घेत असून त्यांच्या या कामाची दखल घेत कमिन्स इंडिया फौंडेशनच्यावतीने मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोव्ह्ज आणि धरा ह्युमन लाइफ रिज्युवेशन सोसायटी तरडगाव यांच्यावतीने सर्व १०० पोलीस पाटील व कुटुंबियांसाठी अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी कमिन्स फौंडेशनचे प्रविण गायकवाड, ह्युमन लाइफ रिज्युवेशन सोसायटीचे नितीन गायकवाड, पोलीस पाटील संघटनेचे प. महाराष्ट्र उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष प्रदीपराव गाढवे पाटील, तालुकाध्यक्ष शांताराम काळेल पाटील, कार्याध्यक्ष दत्तात्रय सरक पाटील, उपाध्यक्ष सुनील बोराटे पाटील, नंदकुमार खताळ पाटील, जिल्हा सल्लागार सोमनाथ जगताप पाटील, अन्य पदाधिकारी व पोलीस पाटील, कमिन्सचे अधिकारी उपस्थित होते.
फलटण तालुक्यात कायदा सुव्यवस्था परिस्थिती सांभाळण्यासाठी गाव पातळीवर पोलीस पाटील उत्तम काम करीत असून जिल्हा व तालुका प्रशासनाने त्याची दखल घेऊन पोलीस पाटलांचे वेळोवेळी कौतुक केले आहे, आताही गेले सुमारे दोन अडीच महिने तालुक्यातील प्रत्येक गावात करोना नियंत्रणासाठी ग्रामस्थांना गर्दी नियंत्रण, हात धुवा, मास्क वापरा, कारणाशिवाय बाहेर पडू नका वगैरे बाबी समजावून देण्यात कार्यरत स्थानिक समितीमध्ये पोलीस पाटील आघाडीवर आहेत, पुणे मुंबई वगैरे शहरी भागातून गावाकडे परतणाऱ्या गावातील लोकांना त्यांचे व गावाचे आरोग्य अबाधीत राखण्यासाठी घ्यावयाची दक्षता, होम क्वारंटाइन केलेल्या लोकांची व्यवस्था, आरोग्य विषयक उपाय योजनांची अंमलबजावणी आणि सर्व माहिती घेऊन तालुका प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात पोलीस पाटील तत्परतेने कार्यरत असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गाढवे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
गाव पातळीवर पोलीस पाटील करोना नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी घेत असलेली मेहनत कौतुकास्पद असल्याचे नमूद करीत त्यासाठी सर्व पाटलांचे कौतुक करतानाच गावाचे आरोग्य सांभाळताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन कमिन्स फौंडेशनचे प्रविण गायकवाड यांनी केले.
कमिन्स फौंडेशन व तरडगाव ह्युमन लाइफ रिज्युवेशन सोसायटी यांनी पोलीस पाटील गावपातळीवर करीत असलेल्या कामाची दखल घेऊन त्यांच्या आरोग्याची जपणूक करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल संघटनेचे तालुकाध्यक्ष शांताराम काळेल पाटील यांनी दोन्ही संस्थांना धन्यवाद देत त्यांचे ऋण व्यक्त केले.