सांस्कृतिक विभाग सदैव कलावंतांच्या पाठीशी – मंत्री सुधीर मुनगंटीवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ मार्च २०२३ । मुंबई । कलावंत जेव्हा समस्या घेऊन सांस्कृतिक विभागाकडे येतील तेव्हा सांस्कृतिक विभाग कलावंतांच्या पाठीशी सदैव उभा राहील, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

वाशी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुलात आयोजित तमाशा महोत्सवात तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे, अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेता संदीप पाठक, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सन २०१८-१९ चा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार कै. गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांच्या कन्या अल्का संगमनेरकर व कल्पना संगमनेरकर यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्वीकारला. तर सन २०१९-२० चा पुरस्कार श्री. अतांबर शिरढोणकर यांना आणि सन २०२०-२१ चा पुरस्कार श्रीमती संध्या रमेश माने यांना यावेळी प्रदान करण्यात आला.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चेहऱ्यावर आनंद देण्याची शक्ती आहे. जगातील महागडे सौंदर्य प्रसाधन म्हणजे चेहऱ्यावरील हास्य व आनंद आहे, ते देण्याची ताकद कलावंतांमध्ये आहे. ही शक्ती आणि उर्जा कायम त्यांच्याकडे रहावी. तमाशाच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना ज्या काही समस्या घेऊन येतील त्या सोडवण्यासाठी आम्ही पाठीशी उभे राहू.


Back to top button
Don`t copy text!