दिल्लीतील विविध मराठी संस्थांच्या योग्य सूचनांची अंमलबजावणी करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ जानेवारी २०२३ । नवी दिल्ली । नवी दिल्लीतील विविध मराठी संस्थांकडून येणाऱ्या कृती योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे सांगितले.

कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात दिल्लीतील विविध मराठी संस्थांशी सोमवारी संवाद साधताना मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. या बैठकीस केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, यांच्यासह विविध मराठी संस्थेचे पदाधिकारी, केंद्र सरकारच्या विविध विभागात प्रतिनियुक्तीवर असलेले मराठी अधिकारी, यासह सदनाचे आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी  उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्याच्या ऐतिहासिक खाणाखुणा आजही महाराष्ट्राबाहेर दिसतात. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, खाद्यसंस्कृती, लोककलेची समृद्ध अशी परंपरा आहे. दिल्लीतील मराठी अधिकारी, येथे वास्तव्यास असलेले मराठी नागरिक हे समृद्ध परंपरा वाढवित आहेत. त्यांचा अभिमान असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. राजधानी दिल्लीत असणाऱ्या संस्थांनी दिलेल्या सूचनांवर विचार करून कृती योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल.

राजधानीत केंद्र सरकारच्या विविध आयोगात, विभागात महाराष्ट्र केडरचे तसेच इतर केडरचे मूळ महाराष्ट्रातील अनेक अधिकारी आहेत. यासह मूळ महाराष्ट्रातील मात्र, व्यवसाय-खासगी नोकरीनिमित्त आलेले मराठी लोक दिल्लीतील विविध भागात अनेक वर्षांपासून राहतात. त्यांनी येथे  विविध  संस्था उभारून  महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती जोपासली आहे. यासोबतच विविध स्पर्धा परीक्षांसाठी येणाऱ्या तरूण मुला-मुलींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या संस्था मदत करतात.

या संस्थांना  येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. यातील काही महत्वाच्या सूचना ज्या आपल्या विभागाशी संबंधित असतील त्यांची त्वरेने अंमलबजावणी केली जाईल, तर उर्वरित सूचनांवर संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!