आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२१ । मुंबई । कान्स चित्रपट महोत्सवाबरोबरच गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या काही वर्षांपासून सर्वोत्तम मराठी सिनेमे सांस्कृतिक कार्य विभागाकडून पाठविण्यात येत आहे. येत्या सप्टेंबर ते  नोव्हेंबर 2021 काळात आयोजित करण्यात येणाऱ्या बर्लिन, व्हेनिस, टोरँटो, सनडान्स, न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादितच्या संचालक मंडळाची 157 वी बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक आंचल गोयल, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांच्यासह सांस्कृतिक कार्य आणि महामंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री.देशमुख म्हणाले की, मराठी चित्रपटांना व्यापक जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजला जावा यासाठी सर्वोत्तम मराठी सिनेमे येणाऱ्या काळात वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सामील करण्यात येणार आहेत. यावर्षी कान्स चित्रपट महोत्सवात कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात सहभाग घेणे शक्य झाले नाही. मात्र आगामी काळात नोव्हेंबर 2021 मध्ये गोव्यात होणाऱ्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या फिल्मबाजार अंतर्गत सर्वोत्तम 10 मराठी चित्रपट पाठविण्यात येणार आहेत. याशिवाय महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्यांचे अभिनंदन

कान्स 2021 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘कडूगोड’ आणि ‘मी वसंतराव’ या दोन चित्रपटांची निवड समिती सदस्यांनी केली आहे. आज झालेल्या बैठकीत या दोन्ही चित्रपटांच्या निवडीबद्दल संबंधित संस्थेचे निर्माते/दिग्दर्शक/ कलाकार यांचे अभिनंदन या बैठकीत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासह उपस्थित अधिकारी यांनी केले.

यावेळी चित्रनगरी परिसरातील चित्रीकरण स्थळे आणि कलागारे यांचे भाडेतत्वावर आरक्षण देताना मेकअपरुम साहित्य पॅकेजनुसार निर्मिती संस्थांना उपलब्ध करुन देणे, कोविडमुळे पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी नवीन उपक्रम राबविणे, महामंडळस्तरावर महामंडळाचे सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत योजना राबविणे, वित्तीय वर्ष 2020-21 चे वार्षिक लेखे व संचालक मंडळाचा अहवाल मंजूर करणे, अशा मुद्दयांवरही चर्चा यावेळी करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!