दैनिक स्थैर्य । दि. २४ जानेवारी २०२३ । मुंबई । क्विक हीलने आपल्या क्विक हील फाउंडेशन या सीएसआर उपक्रमाच्या माध्यमातून राजस्थानातील सिरोही येथील वंचित व आदिवासी समुदायांसाठी आरोग्ययान ही अत्याधुनिक वैद्यकीय व्हॅन देणगी स्वरूपात दिली आहे. ही व्हॅन, विनोद पारसरामपुरीया सेवा फाउंडेशनच्या सहयोगाने, सिरोही, स्वरूपहंज, नितोडा, रोहिडा व भुला येथील ३ लाखांहून अधिक लाभार्थींना उत्तम आरोग्याची भेट देणार आहे. यांत या भागातील दारिद्र्यरेषेखालील ७१३८ कुटुंबांचा समावेश आहे.
क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती अनुपमा काटकर आणि सेवा भारती- जोधपूर प्रांताचे संघटन मंत्री श्री स्वरूप दान यांच्या उपस्थितीत आरोग्य यान सुपूर्द करण्याचा सोहळा पार पडला. क्विक हील फाउंडेशनचे वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक श्री. अजय शिर्के, विभाग प्रचारक श्री. श्याम सिंग आणि सिरोहीचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश कुमार यांच्यासह अन्य प्रतिष्ठित उपस्थित होते.
क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्ष तसेच क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेडच्या प्रमुख श्रीमती अनुपमा काटकर यावेळी म्हणाल्या, “आरोग्यसेवा उपलब्ध करून देऊन उपेक्षित समुदायांना सक्षम करणे हे क्विक हीलच्या सीएसआर उपक्रमांच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे आमच्या फाउंडेशनमार्फत सिरोहीतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबं व आदिवासी लोकसंख्येसाठी देणगी स्वरूपात देण्यात आलेले आरोग्ययान हे याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. १० राज्यांतील ६००हून अधिक खेड्यांतील ११ लाखांहून अधिक आयुष्यांना सेवा पुरवण्याची ण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. या वंचित समुदायांना प्राथमिक वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देता आले याचे आम्हाला समाधान आहे. कोविड-१९ विषाणू पुन्हा पसरण्याची शक्यता लक्षात घेता, वैद्यकीय व्हॅनमध्ये अर्हताप्राप्त डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे नागरिकांना सुरक्षित राहण्यात नक्कीच मदत होणार आहे.”