टाळ मृदुंगांच्या गजरात दिवे घाटाची अवघड लिलया पार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२२ । फलटण ।  एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम l आणिकाचे काम नाही आता ll

पुण्यनगरीचा दोन दिवसाचा निरोप घेवून संत सोपानदेवांच्या सवंत्सरनगरीकडे मार्गस्थ झालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलीसह लाखो वैष्णवांनी टाळ मृदुंगाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत अवघड दिवे घाट लिलया पार केला . सोहळ्याचे पुरंदर तालुक्यात मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले . रात्रो आठ वाजता हा सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सवंत्सरनगरीत विसावला .
नित्यनेमाने पहाटे श्रींची विधीवत पूजा , अभिषेक व आरती करण्यात आली . त्यानंतर माऊली व संत तुकाराम महाराजांचा सोहळा हडपसरकडे मार्गस्थ झाला . शिंदेछत्री येथे माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत करण्यात आले . माउलींच्या दर्शनासाठी हजारो वानवडी , हडपसर परिसरातील भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती . विविध संस्था , संघटनांच्या वतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले .

हडपसर येथे सुमारे तास विश्रांती घेवून सोहळा वडकीनाल्याकडे मार्गस्थ झाला . पुणे ते सासवड ही वाटचाल जवळपास ३२ किलोमीटरची असल्याने वारकऱ्यांची पावले सासवडच्या दिशेने झपझप पडत होती . हडपसर ते वडकी या वाटचालीत अरुंद रस्ता व पोलिसांचे वाहतुकीचे नियोजन ढासळल्याने वारकऱ्यांना वाटचालीत त्रास झाला . त्यातच दुपारी पावणेदोनच्या सुमारास पावसाने काही वेळ हजेरी लावल्याने वारकऱ्यांची एकच तारांबळ उडाली .

दुपारी २ वाजता सोहळा वडकी येथे पोहोचला . वडकी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अरुण गायकवाड , उपसरपंच दिलीप गायकवाड , ग्रामसेवक माधव वाघ यांच्यासह ग्रामस्थांनी माऊलीसह सोहळ्याचे स्वागत केले . वडकी येथून दुपारी ३ वाजता सोहळा दिवेघाटाकडे मार्गस्थ झाला . साडेतीनच्या दरम्यान सोहळा दिवेघाटाच्या पायथ्याशी पोहोचला . रथाला वडकी , फुरसुंगी परिसरातील चार बैलजोड्या लावण्यात आल्या होत्या . टाळ मृदुगांचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत वैष्णवांनी दिवेघाट चढण्यास सुरुवात केली . या सोहळ्या बरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही वैष्णवासंगे घाट चढण्याचा आनंद लुटला . पाऊस पडून गेल्याने वातावरण उत्साही होते . सह्याद्रीच्या पर्वतरांगा जणू हिरवा शालू नेसून माउलीसह वैष्णवांचे स्वागत करीत होत्या असेच वाटत होते . वडकी येथे दिवेघाटाच्या पायथ्याशी समीर आंबेकर यांनी हजारो भाविकांना चहा , खिचडी व महाप्रसाद देवून वैष्णवांची सेवा केली . सह्याद्रीच्या पर्वतरांगात टाळ मृदुंगासह विठ्ठल नामाचा जयघोष दुमदुमत होता . सात किलोमीटरचा दिवेघाट पार करुन अश्वांसह माऊलींचा सोहळा सायंकाळी ५ वाजता झेंडेवाडीफाटा येथे पोहोचला . पुरंदर तालुक्याच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे , आ संजय जगताप , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते , भाजपचे बाबाराजे जाधवराव , प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड , तहसीलदार रुपाली सरनौबत यांच्यासह पुरंदर तालुका वासीयांनी माऊलीसह सोहळ्याचे स्वागत केले .

भाग गेला शीण गेला ,
अवघा झालाशी आनंद ll

असे म्हणत अवघड दिवेघाट चढून माथ्यावर आलेल्या लाखो वारकऱ्यांसह पुणेकरांनी माउलींच्या सोहळ्या बरोबर चालून वारीचा आनंद घेतला . या सोहळ्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती . पोलिसांनी घाटातील वाहने पुढे काढून सोहळ्यातील गर्दी कमी केली . त्यामुळे घाटात वारकऱ्यांना भजनाचा आनंद घेता आला . माऊलीसह वैष्णवांनी झेंडेवाडी फाट्यावर विसावा घेतला . त्यानंतर मार्ग सोपा करीत सोपान देवांच्या दर्शनासाठी लाखो वैष्णवांचा मेळा सवंत्सर नगरीकडे मार्गस्थ झाला . रात्रो आठ वाजता हा सोहळा कर्हेकाठी सवंत्सरनगरीत विसावला . सोहळ्याचा येथे दोन दिवस मुक्काम आहे .


Back to top button
Don`t copy text!