
स्थैर्य, गिरवी, दि. 11 ऑगस्ट : सध्या फलटण तालुक्यातील दक्षिण डोंगरी भागात दोन दिवसांत अधूनमधून श्रावण सरी पडल्यामुळे परिसरातील पिके जोमात झालेली दिसून येत आहेत.
दक्षिण भागात कोरडवाहू जमिनीत बाजरी, मुग, मटकी, उडीद, घेवडा, चवळी, वाटाणा, मेथी, कोथिंबीर इत्यादी पालेभाज्या पिकांनी पावसाअभावी माना टाकल्या होत्या. जिरायती पिकासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकर्यांना दोन दिवसांत श्रावण सरी कोसळत असल्याने दिलासा मिळाला आहे.
गिरवी परिसरात शुक्रवार व शनिवार दोन दिवसांत श्रावण सरी अधूनमधून कोसळत असल्याने मातीत शेतात ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्या अभावी पिकांनी माना टाकल्या होत्या. पण श्रावण सरी कोसळत असल्याने गिरवी भागात ‘श्रावण सरी,बाजरी पिकांसह रक्षण करी’, अशी भावना गिरवी परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
आगामी काळात गणेशोत्सवाच्या कालावधीत अजून पाऊस पडला तर बाजरी, मूग, मटकी उडीद चवळी वाटाणा मेथी कोथिंबीर बाजरी पिके हाताला लागतील अशी आशा निर्माण झाली आहे. श्रावण व भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमी गौरी गणपती या सणावाराला पाऊस हमखास येतो अशी जुन्या जाणत्या अनुभवी शेतकर्यांकडून सांगितले जात आहे. पावसाने साथ दिली तर खरीप हंगामातील पिके शेतकर्यांना चांगले उत्पादन देतील अशी अपेक्षा आहे. खरीप हंगामातील मशागतीची कामे करण्यासाठी केलेला खर्च तरी निघेल अशी आशा आहे.