स्थैर्य, फलटण : फलटण हा रब्बीचा तालुका असला तरीही अलीकडे बदलत्या व लहरी निसर्गामुळे ऋतू चक्र, हवामान अंदाज, पिकांचा कार्यकाल हे परंपरागत निकष बदलत असून त्यानुसार खरीप/रब्बी हंगामही कमी अधिक प्रमाणात बदलत असल्याने त्यानुसार केलेल्या पिकांमधील बदल यशस्वी होत आहेत.
दरम्यान प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फलटण तालुक्यात खरीपाचा पेरा सुमारे १२९.६२% झाल्याचे तसेच सर्व पिके वाढीच्या स्थितीत उत्तम आहेत, काही ठिकाणी कीड रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे मात्र कीड नियंत्रण उपाय योजनाही करण्यात येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
फलटण तालुक्यात वार्षिक सरासरी ६२२.२४ मि. मी. पाऊस पडतो त्यापैकी आतापर्यंत २१७.४४ मि. मी. पाऊस झाला असून वातावरण ढगाळ असल्याने पावसाची प्रतीक्षा तसेच खरीप पेरा अंतीम टप्प्यात असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या दि. ४ ऑगस्टच्या खरीप हंगाम अंतीम पेरणी अहवालात नमूद केले आहे.
तालुक्यात बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र १४८४३ हेक्टर असून त्यापैकी १३१८० हेक्टर म्हणजे ८८.८० % क्षेत्रावर बाजरीची पेरणी अंतीम टप्प्यात पूर्णत्वाकडे जात आहे. पीक वाढीच्या स्थितीत असून अंतर मशागतीची कामे सुरु आहेत. बाजरी पिकाची वाढ समाधानकारक असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी सांगितले.
तालुक्यात मका सर्वसाधारण क्षेत्र ४४९० हेक्टर असून त्यापैकी ४०९६ हेक्टर म्हणजे ९२.२२ % पेरणी पूर्ण झाली आहे, पीक वाढीच्या स्थितीत आहे, मात्र काही ठिकाणी अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव असल्याने त्यावर योग्य उपाय योजनांसाठी प्रचार, प्रसिद्धी, मार्गदर्शन या मार्गाने प्रयत्न सुरु असल्याचे अंतर्गत मशागतीची कामे सुरु असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी सांगितले.
कांदा लागण सुमारे ७४० हेक्टरवर पूर्ण झाली असून पीक वाढीच्या स्थितीत असताना काही ठिकाणी कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे, सोयाबीन सर्वसाधारण क्षेत्र ३६८ हेक्टर असून या संपूर्ण क्षेत्रावर किंबहुना थोड्या अधिकच्या क्षेत्रावर सोयाबीन लागवड पूर्ण झाली आहे. सदर पीक वाढीच्या अवस्थेत समाधानकारक असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणू दिले.
कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र २१ हेक्टर आहे, मात्र सुमारे ३१ हेक्टरवर कपाशीच्या लागणी पूर्ण झाल्या आहेत. या पिकाची वाढ समाधानकारक आहे, एकेकाळी कपाशीचे आगर असलेल्या या तालुक्यातून किडीचा पादुर्भाव आणि समाधानकारक दर मिळत नसल्याने कापूस येथून हद्दपार झाला होता, त्याची पुन्हा सुरुवात होत आहे.
आडसाली ऊसाच्या ८५२९ सर्वसाधारण क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ ५६८५ हेक्टरवर ऊसाच्या लागणी झाल्या असून पावसामुळे सरी काढता न आल्याने ऊसाच्या लागणी लांबल्या आहेत, आगामी काळात उर्वरित क्षेत्रावर लागणी पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे.