दैनिक स्थैर्य | दि. ६ जुलै २०२३ | फलटण |
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२३ साठी फक्त १ रूपयात पिक विमा उपलब्ध करून दिला आहे. या योजनेंतर्गत भात, सोयाबीन व भुईमूग पिकासाठी हा पिकविमा शेतकर्यांना काढता येणार आहे. पिक विमा करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ आहे. या पिक विम्याचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे किंवा अत्यल्प पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडून हवालदिल होतो. हे शेतकर्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पंतप्रधान पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२३ साठी फक्त १ रूपया भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकर्यांना सामील होता येणार आहे. या १ रूपयाच्या पिक विम्यामध्ये भात पिकासाठी पिक संरक्षित रक्कम ५१७६० प्रति हेक्टर असून सोयाबीनसाठी ५७२६७ तर भुईमूग पिकासाठी ३८००० प्रति हेक्टर पिक संरक्षित रक्कम नुकसान झाल्यास शेतकर्यांना मिळणार आहे.
हा पिक विमा भरण्यासाठी पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक व पिक पेरा स्वयंघोषणापत्र ही कागदपत्रे शेतकर्याकडे आवश्यक आहेत. हा पिक विमा आपले सरकार सुविधा महा-ई-सेवा केंद्र, नजीकची राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा ुुु.िाषलू.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर नोंद करता येणार आहे.
पिक विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ असून अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.