दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२२ । सातारा । माझ्या लिहिण्याच्या प्रवासात मासिकांची यंत्रणा प्रबळ होती. मासिकांमुळे मला मोठा वाचकवर्ग मिळाला आणि अनेक लेखिक घडण्यात मासिक संस्कृतीचे मोठे योगदान आहे. मासिकांच्या योगदानाची मराठी समीक्षकांनी दखल न घेत मासिकांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले.
सातार्यात अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे, लोकमंगल ग्रुप शिक्षणसंस्था सातारा, आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात त्या बोलत होत्या. यावेळी विनायक भोसले, शिरीष चिटणीस, विनय हर्डीकर, मगंला खैरनार, वसंत खैरनार, या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र गुर्जर, ज्येष्ठ लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे, आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंगला गोडबोले पुढे म्हणाल्या, जीव तोडून आणि मनापासून लिहिले की, गंभीर लेखन असले तरी वाचकांकडून त्या लेखनाचे स्वागत होते. विनोदी लेखन करणाऱ्यांचे गंभीर लेखन वाचले जात नाही, असा अनुभव माझ्या बाबतीत आलेला नाही. केवळ विनोदी लेखनच विकले जाते, हा गैरसमज आहे. माझ्या मते, जगात सर्वात अधिक चांगला समीक्षक हा ‘काळ’ असतो. समीक्षकांना उगाचच वाटते की, मी या लेखकाला मोठे केले, मी त्या लेखकाला मोठे केले. परंतू कोणी कोणाला मोठे करीत नसते. जे चांगले असते ते काळाच्या पटलावर टिकते, जे निरूपयोगी असते, ते मागे पडते. प्रत्येक पुस्तकाची अंतिम समीक्षा काळच करीत असतो. लेखकाच्या प्रतिभेचे मोल प्रकाशक आणि वाचक ओळखतात आणि ते मोल ओळखून त्या प्रकारच्या लेखकाला ते जोपासतात.माझ्यावर प्रभाव असणाऱ्या व्यक्तींची डुप्लीकेट होण्यापेक्षा मी नेहमी नाविण्याचा शोध घेतला. माझ्या जाणीवांशी, निष्ठांशी मी १०१ टक्के प्रामाणिक राहिले. माझ्या या लेखन प्रवासात त्या जाणीवांचे चांगल्यात चांगले प्रतिबिंब मी उमटविण्याचा प्रयत्न केला.
प्रकाशन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नाशिक येथील वसंत खैरनार यांना जीनवगाैरव पुरस्कार, उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती आणि सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पारितोषिक संमेलनाध्यक्ष रवींद्र गुर्जर आणि विनय हर्डीकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. वसंत खैरनारविनय हर्डीकर यांनी मनोगत तर राजीव बर्वे यांनी प्रास्ताविक केले.