बिहार निवडणुकीवरून टीका : बिहारमध्ये कोरोना संपला असेल तर केंद्र सरकारने तसे जाहीर करावे, संजय राऊत यांचा भाजपला टोला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.२५: देशभरात कोरोनाचे संकट असतानाच निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर टीकास्त्र सोडले. बिहारमध्ये कोरोना संपला का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. बिहारमध्ये कोरोना संपला असेल तर केंद्र सरकारने तसे जाहीर करावे, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

… तर मग विधानसभा निवडणूक का घेतली जात आहे?

बिहारमध्ये कोरोना संपलाय का? असा सवाल करत राऊत म्हणाले की, देशात कोरोनाची अभूतपूर्व परिस्थिती आहे. सध्या लोकांना बोटावर शाई लावण्याची नाही तर मदतीची गरज आहे. कोरोनाच्या भीतीने राज्यांमध्ये आणि देशांत अधिवेशन होत नाही. एक मंत्री, 3 खासदारांचे निधन झाल्याने संसदेचे अधिवेशन गुंडाळण्यात आले. मग विधानसभा निवडणूक का घेतली जात आहे? कोरोना नावाचे प्रकरण संपवून टाकले असे जाहीर करा, असेही ते म्हणाले.

निवडणुकीत कृषी आणि कामगार विधेयकाचा परिणाम होणार नाही

पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकशाहीची बूज राखली गेली पाहिजे. निवडणुका घेण्यासाठी परिस्थिती योग्य आहे की नाही? याचाही विचार करायला हवा होता. तसेच बिहार निवडणुकीत कृषी आणि कामगार विधेयकाचा काहीही परिणाम होणार नाही. बिहारमध्ये धर्म आणि जातीच्या आधारावरच मतदान होते. तिथे क्वचितच गरिबी हा मुद्दा चालतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. बिहारमधील जनतेच्या मनात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात राग आहे. मात्र तिथे विरोधी पक्ष किती सक्षम आहे, यावर सर्व अवलंबून असल्याचे ते म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!