स्थैर्य, सातारा, दि. 11 : जिल्ह्यात दुपारी 2 नंतर दुकाने बंद करण्याचा जिल्हाधिकार्यांचा आदेश मोडून दुकाने सुरू ठेवून गर्दी जमवणार्या तीन जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुलतान सत्तार शेख वय 39 रा. प्रतापगंजपेठ सातारा, अतुल तपासे रा. शाहुपुरी व परशुराम मारुती सपकाळ वय – 45 रा. शुक्रवार पेठ अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार सुनिल जयसिंग भोसले शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी दुपारी 3 वाजता प्रतापगंज पेठेतील शेख टेड्रस नावाचे दुकान दुपारी 2 वाजून गेले तरी सुरू असल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी लोकांची गर्दी जमली होती. त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली असता दुकानमालक सुलतान सत्तार शेख याच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग झाल्याचे आढळून आले.
तसेच सायंकाळी 6 वाजता बुधवारपेठ सातारा येथील एक्साईड बँटरी अँण्ड इलेक्ट्रीशन नावाचे दुकान सुरू होते. व तेथे लोकांची गर्दी असल्याचे दिसले. त्यामुळे दुकानदाराकडे चौकशी केली असता अतुल तपासे असे आपले नाव सांगितले. तसेच सातारा येथीलच तिरुपती कुशन नावाचे दुकानही सुरू होते. त्याठिकाणी गर्दी दिसली. पोलिसांनी सदर दुकानदास नाव गाव विचारले असता त्याने परशुराम मारुती सपकाळ असे नाव सांगितले.
जिल्हाधिकारी यांचे आदेशाप्रमाणे सर्व प्रकारची दुकाने दुपारी 2.00 वा.पर्यंत बंद करण्याचे आदेश असताना तिघांनीही दुकाने सुरू ठेवुन माल विक्री करीत लोकांची गर्दी करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तसेच महाराष्ट्र कोविड कायदा कलम 11 प्रमाणे तिघांवरही गुन्हा दाखल झाला आहे.