नागठाणे आंदोलनातील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । सातारा । मंगळवारी नागठाणे (ता. सातारा) येथून गणेशवाडी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सामील झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह सुमारे ७४ शेतकरी आंदोलकांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणचे गणेशवाडीचे सहायक अभियंता अजित आधिकराव ढगाले यांनी याबाबत मंगळवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली.

याबाबत बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके हे सुमारे शंभर लोकांचा मोर्चा घेऊन गणेशवाडी महावितरण कार्यालय येथे येऊन गेटवर ठिय्या मारून बसले. त्यामुळे कार्यालयात येण्या-जाण्यास अडथळा निर्माण झाला. त्यांनी शेतीपंप थकबाकीसाठी खंडित केलेला वीजपुरवठा जोडण्याची मागणी केली.
यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यानी त्यांच्याशी चर्चा करून दहा टक्के वीजबिल भरल्यावर कनेक्शन जोडू तसेच वरिष्ठ कार्यालयाचा निर्णय होईपर्यंत आंदोलन स्थगित करा असे सांगितले. मात्र, आंदोलक आंदोलनावर ठाम राहिले. त्यामुळे आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून विनामास्क, सुरक्षित अंतर न ठेवता स्वतः व इतरांच्या जीवितास धोका होईल व संसर्गजन्य रोगाचा प्रसार होईल हे माहीत असूनही बेजबाबदारपणे आंदोलन केले.

बोरगाव पोलिसांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र (राजू) सर्जेराव शेळके (जावळापूर), मधुकर रामचंद्र खुळे (नागठाणे), दीपक शंकर नलवडे (नागठाणे), नितीन हणमंत घाडगे (बोरगाव), राजू शंकर केंजळे (अतीत) यांच्यासह सुमारे ७४ शेतकरी आंदोलकांवर भारतीय दंड संहिता १८६० कलम १८८,३६९,३४१, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१(ब),महाराष्ट्र कोविड-१९ विनियमन २०२० कलम ११ व साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास हवालदार राजू शिखरे करत आहे.


Back to top button
Don`t copy text!