दैनिक स्थैर्य । दि.१८ फेब्रुवारी २०२१ । सातारा । केंजळ येथे अनाधिकृत शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्या प्रकरणी ३६ तरुणांवर गुन्हे दाखल भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आत्ता पर्यंत २८ जणांना ताब्यात घेतले असून त्यातील २२ जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
केंजळ (ता वाई) गावात विनापरवाना छत्रपतीं शिवाजी महाराजांचा पुतळा शुक्रवारी (दि११)रोजी बसवल्याने पोलीस व महसूल प्रशासन गावात दाखल झाले होते. शासनाची परवानगी न घेता पुतळा बसविल्याने गावात तणावाचे वातावरण झाले होते. पुतळा ग्रामस्थ व युवकांनी काढून घ्यावा व प्रशासनाची परवानगी घेऊन बसवावा यावर प्रशासन ठाम असताना पुतळा हटविण्यास गावातील ग्रामस्थ आणि युवकांचा विरोध केल्याने अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे,पोलीस उपअधीक्षक गणेश केंद्रे,तानाजी बरडे, डॉ. शीतल जानवे खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी मोठा बंदोबस्त नेमून शनिवारी रात्री पुतळा हटविला.
याप्रकरणी ३६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामधील सहा जणांना रविवारी सोमवारी तर २२ जणांना मंगळवारी अटक करण्यात आली. यामध्ये वाई, खंडाळा, केंजळ येथील युवकांचा समावेश आहे. यामध्ये उच्च शिक्षित तरुणांचा समावेश आहे. त्या सर्वांना नोकरीच्या वेळी कायदेशीर प्रक्रियेमुळे त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. पोलिसांनी या सर्वांकडून पुतळा व चबुतरा उभारणी कामात आर्थिक मदत केलेल्यांची माहिती पोलिसांनी मिळवली असून त्या सर्वांना पोलीस ताब्यात घेणार आहेत. याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही अशी माहिती वाईच्या पोलीस उपअधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे यांनी दिली. अधिक तपास आशिष कांबळे करत आहेत.