दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑक्टोबर २०२१ | खंडाळा | खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीमध्ये शिरवळ ते पळशी जाणार्या रोडवर जीपमधून बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करणार्या तीन जणांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जीपसह तीन जनावरे असा एकूण 1 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल शिरवळ पोलीसांनी जप्त केला आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, पळशी ता.खंडाळा येथील अविष्कार रोहिदास भरगुडे याने दूरध्वनीद्वारे अभिजित विठ्ठल भरगुडे या मित्राला जीप (क्र. एमएच-42-एक्यू-3524). मधून पळशी येथून जनावरे भरून येत असून सदरची जनावरांची वाहन अडव असे सांगितल्याने सदरची जीप शिरवळ ते पळशी जाणार्या रोडवर अभिजित घोरपडे याने अडविली. यावेळी जीपची पाहणी केली असता त्यामध्ये साधारणपणे दोन वर्षे वयाचे 4 हजार रुपये किमतीचे खोंड,दिड वर्षाचे 3 हजार रुपये किमतीचे एक खोंड, एक वर्षाचे 2 हजार रुपये किमतीचे खोंड व 1 लाख 50 हजार रुपये किमतीची जीप असा एकूण 1 लाख 59 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जीपचालक अमित कैलास चौधरी (वय 24,रा. उरळीकांचन जि.पुणे ),विलास तायाप्पा चौधरी (वय 38),रामा तात्या चौधरी (वय 20 दोघे रा. पाडेगाव ता.फलटण जि.सातारा) या तिघांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची फिर्याद अभिजीत घोरपडे याने शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल बारेला हे करीत आहे.