
दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२२ । खंडाळा । तोंडल गावच्या हद्दीमध्ये जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहतूक केल्याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनला तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन मु-हा जातीच्या म्हशींसह पिकअप जीप असा ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल शिरवळ पोलीसांनी जप्त केला आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, खोपी ता.भोर जि.पुणे येथून तीन मुऱ्हा जातीच्या म्हशी खरेदी करून निघालेली पिकअप जीप(क्रं.एमएच-११-टी-४९१२) हि फलटण बाजूकडे जात असल्याची माहिती खंडाळा येथील निखिल खंडागळे याने हृषीकेश नंदकुमार भागवत (वय २४,रा.पुणे) याला दूरध्वनीद्वारे दिली. यावेळी संबंधित पिकअप जीप हि तोंडल ता.खंडाळा गावच्या हद्दीत आली असता निखिल खंडागळे व इतरांनी सदरील वाहन थांविले असता वाहनामध्ये तीन मुऱ्हा जातीच्या म्हशी आढळून आल्या. यावेळी संबंधित वाहन हे शिरवळ पोलीस स्टेशनला आणले असता शिरवळ पोलीसांनी १ लाख १० हजार रुपयांच्या तीन मु-हा जातीच्या म्हशी,२ लाख रुपये किमतीची पिकअप जीप असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जनावरांची रवानगी वेळे येथील गोशाळेत करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी चालक इस्लाम गफूर शेख (वय २५),सोहेल चांद शेख (वय २०),रफिक मगबूल शेख (वय २३,सर्व रा.सरडे ता.फलटण) यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद हृषीकेश भागवत याने शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस अंमलदार संजय संकपाळ हे करीत आहे.