स्थैर्य, सातारा, दि. ०४ : घरपोहोच पार्सलच्या सुविधेचा आदेश असतानाही हॉटेलमध्ये बसून लोकांना खाद्य पदार्थ खाण्यास परवानगी दिल्यामुळे शहरातील तीन हॉटेल मालकांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
यादोगोपाळ पेठेतील श्रीराम वडापाव सेंटर शाखा नं ३ हे हॉटेल सुरू होते. यामध्ये दोन ग्राहक खाद्य पदार्थ खात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी अशोक बजरंग पवार (वय ४५) रा. शाहूनगर, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच हॉटेल भोळा या ठिकाणीही दोन लोक खाद्य पदार्थ खात होते. त्यामुळे पोलिसांनी हॉटेल मालक संदीप सचिन गायकवाड (वय ४७) रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर राजवाडा चौपाटी येथे फास्ट फुड नावाचे स्नॅक्स सेंटरमध्ये तीन ते चारजण बसून खाद्य पदार्थ खाताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी केदार उल्हास भोसले (वय २६) रा. समर्थ मंदिर परिसर, सातारा यांच्यावरही गुन्हा दाखल केला.
या तिन्हीही हॉटेल मालकांनी घरपोहोच पार्सलची सुविधा न देता हॉटेलमध्येच लोकांना खाण्यासाठी बसविले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.