युवकावर विनयभंगाचा गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ मे २०२२ । सातारा । सातारा शहरातील एका महाविद्यालयामध्ये तु पुन्हा आलीस तर मी तुला जीवे ठेवणार नाही,’ अशी तंबी दिल्यामुळे संबंधित तरूणीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित युवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. सोहन संतोष चव्हाण रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील एका महाविद्यालयामध्ये २१ वर्षीय तरूणी बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. सोमवार, दि. २३ रोजी दुपारी सव्वा चारच्या सुमारास संबंधित महाविद्यालयीन तरूणी कॉलेजमधील लॅबमध्ये होती. त्यावेळी सोहन हा तेथे गेला. लॅबमधून हाताने खुणावून त्याने तिला बाहेर बोलावले. ‘तू खूप छान दिसतेस. मला आवडतेस. पण तू कोणाबरोबर बोलू नकोस,’ असे म्हणून तिच्या अंगाला स्पर्श केला. ‘मला हात लावू नको,’ असे ती तरूणी म्हणताच सोहनने त्या तरूणीच्या गालावर चापट मारली. तसेच मांडीवर लाथ मारली. ‘तू पुन्हा कॉलेजला आलीस तर मी तुला जीवे ठेवणार नाही, अशी त्याने धमकी दिली. या प्रकारामुळे संबंधित तरूणी भयभीत झाली होती. त्यामुळे तिने हा प्रकार लगेच कोणाला सांगितला नाही. मात्र, जर तक्रार केली नाही तर त्याचा पुन्हा त्रास होईल म्हणून धाडस करून संबंधित तरूणीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सोहन चव्हाण याच्यावर विनयभंगसह मारहाणीचा गुन्हा दाखल केला.


Back to top button
Don`t copy text!