दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२२ । सातारा । नागठाणे (ता. सातारा) येथील तत्कालीन ग्रामसेवकाविरोधात गुरुवारी रात्री उशिरा बोरगाव पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन चंद्रकांत पवार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. त्यांच्या कार्यकालात त्यांनी नागठाणे ग्रामपंचायतीत सुमारे ८४ लाख रुपयांचा अपहार केला असल्याची फिर्याद सातारा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जितेंद्र नामदेव काकडे यांनी दिली आहे. संशयित सचिन पवार यांना गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागठाणे ग्रामपंचायतीचे तत्कालीन व सध्या निलंबित असलेले ग्रामसेवक सचिन पवार यांनी सन २०१४ ते २४ ऑगस्ट २०२१ या कालावधीत ग्रामपंचायतीचा कारभार पाहत असताना ग्रामपंचायतीच्या गाळ्यांच्या डिपॉझिटच्या रकमा, करवसुलीच्या भरणा न केलेल्या रकमा, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या फर्मच्या नावे १४ व १५ वित्त आयोगातील रक्कम बेकायदेशीररीत्या वर्ग करून ती ती पुन्हा आपले नावे घेतली. तसेच कोविड काळात बोरगाव पोलिसांनी वसूल केलेल्या दंडाची रक्कम शासनाला भरली नाही.तसेच सन २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षात ग्रामनिधी व ग्राम पाणीपुरवठा खात्यातून मूल्यांकानाशिवाय खर्च करून असा सुमारे ७९,२२,१७३ रुपयांचा अपहार केला.
तसेच कोटेशनशिवाय खर्च व रोखीने अदा जादा जमा दाखवून ५,५५,४७७ रुपयांची अनियमितता दाखवली आहे.त्याचप्रमाणे ६८ गाळे वाटप करताना डिपॉझिट रकमेचे दप्तर अनधिकृतपणे स्वतःच्या ताब्यात ठेवले.बोरगाव पोलीस ठाण्यास नमुना क्र.७ ची १० पुस्तके दिली होती.त्यामध्ये दंडाच्या स्वरूपात जमा झालेली ९६,६८७ रुपये रक्कम पोलिसांनी तात्कालीन ग्रामसेवक सचिन पवार यांचेकडे विश्वासाने सुपूर्द केली होती.या रकमेचाही अपहार केला आहे.तसेच नमुना क्र.७ ची ७३ पुस्तके नागठाणे ग्रामपंचायतीत जमा केलेली नाहीत.ग्रामसभेच्या इतिवृत्तात खाडाखोड तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या अटींचे उल्लंघन करून बेकायदेशीर,विनापरवाना,अनधिकृत ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर गाळेबांधकाम केले असे बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी संशयित सचिन पवार यांच्याविरोधात विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव करत आहेत.