स्थैर्य, सातारा, दि. 8 : महिलेस शिवीगाळ करून चिखलात ढकलून देवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी लिंब येथील एकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजी आप्पा वरकडे रा. लिंब, ता. सातारा असे संशयीताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, संबंधित महिलेच्या मुलाने शेजारील एका मुलास नाना या नावाने हाक मारली. मात्र, ही हाक आपल्यालाच मारली, असा समज होवून तेथे असलेल्या शिवाजी आप्पा वरकडे याने त्या मुलास ‘अक्कल आहे का? हेच वळण लावले का’? असा विचारत रागावू लागला. यावेळी संबंधित महिलेने शिवाजी वरकडे याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, वरकडे त्या महिलेलाच शिवीगाळ व दमदाटी करू लागला. तसेच त्याने महिलेच्या अंगावर धावून जात तिला चिखलात ढकलून देत तिचा विनयभंग केला. तसेच त्या पीडित महिलेच्या पतीलाही वरकडे याने शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली. याप्रकरणी शिवाजी वरकडे याच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हवालदार बागवान तपास करत आहेत.