दैनिक स्थैर्य । दि.०९ जानेवारी २०२२ । सातारा । निनाम पाडळी, ता. सातारा येथे बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या दोघांवर वन विभागाने गुन्हे दाखल केले आहे. यांच्याकडून ट्रॅक्टरट्रॉली, दोन कटर मशीन, आणि तोडलेली वृक्षाची लाकडे असा एकूण अंदाजे साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत वनविभागाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, निनाम पाडळी, ता. सातारा गावच्या हद्दीत एका शेतामध्ये बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असल्याची माहिती सातारा तालुका वन विभागाला प्राप्त झाली. माहितीच्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण व त्यांचे सहकारी अशोक मलप, सूर्याजी ठोंबरे, सिंधु सानप, संतोष दळवी घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी जांभळाची ५ वृक्षे २ कटरच्या सहाय्याने तोडून ठेवली असल्याचे निदर्शनास आले. नजीकच तोडलेली वृक्षाची लाकडे वाहतूक करण्यासाठी एक ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती. वन विभागाच्या पथकाने ट्रॅक्टरट्रॉली, दोन कटर मशीन, आणि तोडलेली वृक्षाची लाकडे असा एकूण अंदाजे साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी संपत दिनकर जाधव, रा.निनाम पाडळी, ता. सातारा आणि मंगेश रमेश भोसले, रा. डबेवाडी, ता. सातारा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई उपवन संरक्षक श्महादेव मोहिते, सहाय्यक वन संरक्षक सुधीर सोनवले यांच्या मार्गदर्शनाखाली केली. सातारा तालुक्यामध्ये कोठेही बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असल्यास त्याबाबतची माहिती वन विभागाला द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.