दैनिक स्थैर्य | दि. १८ जुलै २०२३ | फलटण |
जावली (ता. फलटण) गावच्या हद्दीत अवैध वाळू उपसा करून वाळूची चोरी करणार्या दोघांवर महसूल विभाग व फलटण ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अंदाजे १ लाख रुपयांची चोरीची वाळू व ६ लाख ५० हजारांचा जेसीबी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शैलेश नानासो गावडे (रा. गुणवरे) व अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याची फिर्याद तलाठी विलास नारायण खाडे यांनी पोलिसात दिली आहे.
या चोरीची अधिक माहिती अशी, जावली (तालुका फलटण) गावच्या हद्दीत कुंभारखाणी भागामध्ये जमीन गट नंबर ३४३ मध्ये दि. १५ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास प्रताप रामचंद्र मोरे यांचे जमिनीलगत आडोशाला ओढ्याच्या बाजूला अज्ञात इसमाने अंदाजे दोन ते तीन ब्रास वाळू बेकायदेशीर बिगर परवाना वाळू उत्खनन करून चोरी करून नेली आहे. या ठिकाणी एक बिगर नंबरचा पिवळ्या रंगाचा जेसीबी मिळून आला म्हणून जेसीबी मालक शैलेश नानासो गावडे (रा. गुणवरे) व अज्ञात इसमाविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पो. हवा. साबळे करत आहेत.