दैनिक स्थैर्य । दि. २० डिसेंबर २०२१ । सातारा । सहा लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर प्रतिमहिना तीस हजार रुपयांचा परतावा देण्याची हमी दिल्यानंतरही तो दिला नसल्यामुळे सातारा तालुका पोलीस ठाण्यात मुंबईतील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश बाळशिराम हाडवळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती.
याबाबतची अधिक माहिती अशी की, योगेश धोंडिराम धुमाळ (वय ३0, रा. कर्मवीर कॉलनी, साईराज अपार्टमंेट, फ्लॅट नंबर ३, विद्यानगर, सैदापूर, ता. कराड, जि. सातारा. मूळ रा. चांभारवाडी, पो. आरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी व्यवसायातील गुंतवणुकीसाठी प्रकाश बाळशिराम हाडवळे (रा. सिध्दीगणेश मंदिराशेजारी, ए / ४, शिवनेरी बिल्डींग, आर. बी. कदम मार्ग, भाटवडी, घाटकोपर वेस्ट, बर्वेनगर, मुंबई) याला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वडगाव हवेली (ता. कराड) शाखा येथून आरटीजीएस व मोबाईलद्वारे ऑनलाईन ट्रांजेक्शन तसेच पत्नी रुपाली यांचा खातेक्रमांक असलेले धनादेश समक्ष दिले. ही रक्कम सहा लाख रुपये होती.
या गुंतवणुकीच्या बदल्यात प्रकाश याने योगेश यांना प्रतिमहिना तीस हजार रुपये गुंतवणुकीचा परतावा भाग म्हणून देणार असल्याची हमी दिली होती. हा संपूर्ण प्रकार कराड तालुक्यातील वडगाव हवेली आणि सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील हॉटेल स्वरासमोर फेब्रुवारी २0१९ ते दि. १३ मार्च २0१९ या कालावधीत घडला आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रकाश याच्याकडून कोणतीही रक्कम परत करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर योगेश धुमाळ यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात प्रकाश हाडवळे याच्याविरोधात तक्रार दाखल केली. प्रकाश याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर फरांदे करत आहेत.