दैनिक स्थैर्य । दि. ०७ जुलै २०२२ । सातारा । रविवार पेठ, सातारा येथे असलेल्या वैदेही मल्टी अॅग्रो को. ऑप. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे न देता आपआपसात संगनमत करुन फसवणूक केली. या प्रकरणी चेअरमनसह चौघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुमारे २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सोसायटीचे चेअरमन सोमनाथ नेहे, अशोक महामुलकर, रामचंद्र जाधव, सागर पंडित यांच्या विरुध्द शरद शंकरराव मोरे वय ६३, रा. राधिका रोड, सातारा यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत सातार शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. २१ जून २0१९ पासून वेळावेळी घडली आहे. तक्रारदार यांनी या सोसायटीमध्ये पैशांची गुंतवणूक केली. जुलै २0२१ मध्ये त्यांनी गुंतवलेल्या पैशांची मुदत संपल्याने ते पैसे काढण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना पैसे नंतर देतो, असे सांगून वारंवार टाळण्यास सुरुवात केली. मुदत दिल्यानंतरही पैसे मिळत नसल्याने त्यांनी तक्रारदार यांनी अधिक माहिती घेतली असता अन्य सभासदांचेही पैसे मिळत नसल्याचे समजले. इतर सभासद, गुंतवणूकदारांना पैसे मिळत नसल्याने ते सर्वजण एकत्र गेले. मात्र सोसायटीचे कार्यालय बंद होते. चेअरमनसह इतरांना संपर्क साधला असता त्यांचे फोन बंद लागले. फसवणूक झाल्याचे समोर आल्याने अखेर तक्रारदारांसह इतर गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. आतापर्यंत २४ लाख ८१ हजार ८२0 रुपयांची फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन सोमनाथ खंडू नेहे, प्रतिनिधी अशोक तुकाराम महामुलकर, रामचंद्र जगन्नाथ जाधव, सागर पंडित या चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.