
दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । सातारा । साता-यातील एका गणेशाेत्सव मंडळानं दाेन दिवसांपुर्वी आपल्या लाडक्या गणपती बाप्पास वाजत गाजत मंडळात नेलं. त्यावेळी कार्यकर्ते बेभानहून नाचत हाेते. बाप्पा आला म्हटल्यावर परिसरातील नागरिकांनी त्याचे दर्शन घेतलं. हे सर्व हाेत असताना कार्यकर्त्यांना वेळेचं भान राहिलं नाही आणि दाेन दिवसांनी मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह साऊंड सिस्टीम चालकांवर सातारा पाेलिसांनी ध्वनी प्रदूषण नियमा अंर्तगत कारवाई केली .
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रविवारी रात्री दहा वाजून 58 मिनिटांच्या सुमारास सदरबझार येथील गणेश काॅलनी (सर्वटे रुग्णालयासमाेर) येथे गणेशाेत्सव साजरा करणाऱ्या एका मंडळानं गणेशमुर्ती आगमन मिरवणुकीत एका वाहनावर कर्णे बसवून, स्पीकर बसवून कर्ण कर्कश आवाजात जास्त वेळ वाद्य सुरु ठेवले. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास हाेईल असे वर्तन झालं. संबंधितांनी स्पीकर परवान्याचे उल्लंघन केले व विना परवानगी स्पीकर, वाद्य वाजवलेने ध्वनी प्रदुष्ण केले.
संबंधित मंडळाचे अध्यक्ष व साऊंड मालक तसेच इतरांवर न्यायालयात खटला दाखला करुन कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. त्यानूसार संबंधित गणेशाेत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत माेहिते (गणेश काॅलनी), उपाध्यक्ष चेतन लंबाते (गणेश काॅलनी), साऊंड सिस्टीम मालक अन्सार शेख (शनिवार पेठ, तेलीखड्डा), लाईट व जनरेटर मालक रजनीकांत नागे (रविवार पेठ), वाहन चालक गणेश जगदाळे (मल्हार पेठ) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.