स्थैर्य, सातारा, दि. २१ : लग्न होण्याअगोदर युवतीशी वारंवार जबरदस्तीने बलात्कार केल्यानंतर लग्नास नकार दिल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुमित लक्ष्मण इंगळे (सध्या रा. मधुश्री पार्क, वाढेफाटा मूळ रा.बार्शी जि.सोलापूर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, त्याच्या कुटुंबियाविरुध्द मारहाणीचाही गुन्हा दाखल झाला आहे.
मार्च महिन्यात लॉकडाउन लागल्याने एप्रिल महिन्यात लग्न घेण्याचे रद्द करण्यात आले. याच दरम्यान सुमितच्या कुटुंबियांनी अचानक हे लग्न मान्य नसल्याचा निरोप तक्रारदार युवतीच्या कुटुंबियांना कळवला. या घटनेनंतर तक्रारदार कुटुंबिय दोनवेळा संशयितांना भेटायला गेले. मात्र संशयितांनी त्यांना दमदाटी, शिवीगाळ करुन मारहाण केली. फसवणूक झाल्याचे व युवतीवर बलात्कार झाल्याने अखेर सोमवारी तक्रारदार युवतीने कुटुंबियांसह शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले. घटनेची माहिती दिल्यानंतर सपोनि विशाल वायकर यांनी गुन्हा दाखल करुन घेतला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताचा शोध घेतल्यानंतर तो सापडला. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 24 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुमित इंगळे, लक्ष्मण इंगळे, सागर इंगळे व आणखी दोन महिलांवर (सर्व रा.वाढेफाटा) गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सातारा परिसरातील 26 वर्षीय युवतीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना गेल्या 11 महिन्यांमध्ये घडलेली आहे. तक्रारदार युवतीने ऑगस्ट 2019 मध्ये ऑनलाईन अॅपवर लग्नाचा बायोडाटा अपडेट केला. तो बायोडाटा पाहून इंगळे कुटुंबियांनी तक्रारदार युवतीच्या कुटुंबियांना संपर्क केला. मुलीचा बायोडाटा पाहिल्याचे सांगून मुलीला पाहण्यासाठी सातारला येत असल्याचे संशतियांनी सांगितले. त्यानुसार दोन्ही कुटुंबिय एकमेकांना भेटले व पुढे त्यातून पसंती झाली व लग्नाचे निश्चित करण्यात आले. त्या दोघांचा साखरपुडाही करण्यात आला व एप्रिल 2020 मध्ये लग्न घेण्याचे ठरले.
साखरपुडा झाल्यानंतर तक्रारदार युवतीचा सुमित याने मोबाईल नंबर घेतला. तेथून दोघांचा संपर्क वाढत गेला. दि. 29 फेब्रुवारी 2020 रोजी सुमित एम एच 14 एफजी 5611 या कारमधून आला व युवतीला पाचगणी येथील सिल्व्हर लीफ हॉटेलवर घेवून गेला. तेथे त्याने जेवण करु, असे सांगत रुम घेतली. त्याठिकाणी त्याने ड्रिंक घेतली व युवतीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने युवती घाबरली व तेथून ती बाहेर पडली. सुमित याने बाहेर आल्यानंतर युवतीची माफी मागितली. यानंतर पुन्हा सुमित याने सातारा परिसरात दोन ठिकाणी नेले व तेथे जबरदस्तीने युवतीवर बलात्कार केला. या घटनेमुळे युवती घाबरली होती मात्र लग्न एप्रिल महिन्यात असल्याने युवतीने कोणाला सांगितले नाही.