दैनिक स्थैर्य । दि.२९ मार्च २०२२ । सातारा । मंदीसदृश्य अवस्थेतील बांधकाम क्षेत्रास कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यातच रशिया, युक्रेन युध्दाचाही अप्रत्यक्ष परिणाम बांधकाम क्षेत्रावर होवू लागला आहे. काही वर्षापासून स्टील, सिमेंट व इर बांधकाम साहित्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने गांभीर्याने विचार न केल्यास बांधकाम व्यावसायिकांना काम बंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा क्रेडाईचे अध्यक्ष सुधीर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी क्रेडाईचे जॉईंट सेक्रेटरी सागर साळुंखे, मंगेश वाडेकर, राहुल वाखारिया, बाळासाहेब ठक्कर आदी उपस्थित होते.
सुधीर शिंदे म्हणाले, बांधकाम क्षेत्रातील विविध साहित्याच्या किंमती नियंत्रणात न आल्यास बांधकामात ५00 रु पयांनी वाढ करावी लागणार असून त्याचा भुर्दंड ग्राहकांना बसणार आहे. सध्या बांधकाम क्षेत्रात स्टीलचा दर दरवर्षापूर्वी प्रति टन ४२ हजार रुपये होता. आता तो ८४ हजार म्हणजे दुप्पटच झाला आहे. सिमेंटचा (प्रती बॅग) दर रुपये २६0 इतका होता. तो आता ४00 च्या घरात गेला. ४ इंच विटाचा दर प्रति हजारामागे ८ हजार होता तो १३ हजार झाला आहे. वाळू, क्रश सँडमध्ये अशीच मोठी दर वाढ दिसून येत आहे.
बांधकाम साहित्याबरोबरच इलेक्ट्रीक वायर, फिटिंगस, टाईल्स सॅनेटरी वेअर, फॅब्रिकेशन, ॲल्युमिनीअम सेक्शन्स व मजुरी यामध्ये साधारणपणे ४0 टक्केनी दरवाढ झाली. या सर्वाचा परिणाम म्हणजे बांधकाम दरामध्ये ४00 ते ५00 स्के. फूटांनी वाढ झाली आहे. बांधकाम साहित्याच्या किंमतीत झालेली ही वाढ नैसर्गिक आहे की, सट्टेबाजीमुळे किंवा नफेखोरीमुळे होत आहे याची प्रशासनाने व सरकारी यंत्रणानी पडताळणी करुन बांधकाम साहित्याच्या किंमती नियंत्रणात आणून सर्वसामान्य गृह खरेदीदरांना दिलासा द्यावा.