
स्थैर्य, सातारा, दि. 6 डिसेंबर : लोकमंगल हायस्कूल नागेवाडी-कुशी येथे अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे शाखा सातारा आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोळावे एक दिवसीय बालकुमार साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष आयटी इंजिनिअर सागर शिंदे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस होते. प्रमुख पाहुणे म्हणून कथाकथनकार व संस्थेचे कार्यवाह डॉ. दिलीप गरुड, प्राथमिक शिक्षक कुलदीप मोरे आणि उद्योजक अक्षय भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन सत्रात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, राष्ट्रगीत, राज्यगीत असा कार्यक्रम झाला. तबला वादनाच्या साथीने दत्तात्रय सावंत व रमेश महामुलकर यांनी राज्यगीत सादर केले. शिल्पा चिटणीस यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
कथाकथन सत्रात ईश्वरी सावंत (गुरुदक्षिणा), अक्षरा मतकर (नवा प्रकाश), साक्षी काटकर (आईच्या प्रेमाची किंमत), आयुष मोरे (कष्टाचे फळ), श्रीराज सावंत (हरवलेली चिमणी) आणि शंभूराज पवार (शूर शिवराय) यांनी आकर्षक कथा सादर करीत वातावरण रंगवले. कविता सत्रात श्रीनाथ सावंत यांनी ‘बाप’, श्रावणी साळुंखे हिने ‘बाबा’, श्रेया साळुंखे हिने ‘एक मित्र’, तर अथर्व चव्हाण याने ‘छावा’ ही स्वरचित कविता सादर केली. अथर्व चव्हाण (तोतो चॅन), साक्षी शिंदे (अग्निपंख), संध्या गुरव (छावा) आणि अश्विनी देवकर (अग्निपंख) यांनी पुस्तकावर आधारित मनोगत मांडले. इयत्ता 8वी व 9वीतील विद्यार्थ्यांनी शिवबाचा नाव, माय भवानी, मेरी मिट्टी मे मिल जावाँ, माऊली माऊली, विठ्ठल विठ्ठल या गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन श्रेया कोंढाळकर, अनुष्का सावंत व प्रीती सावंत यांनी केले.
या वेळी शाळेचा विद्यार्थी प्रणय साळुंखे याची भारतीय सैन्यात निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. डॉ. दिलीप गरुड म्हणाले, चरित्रे व आत्मचरित्रे वाचनातून मुलांचे व्यक्तिमत्व घडते. शब्दसंपत्ती वाढल्याशिवाय अभिव्यक्ती परिपूर्ण होत नाही. वाचून समृद्ध व्हा व उद्याचा भारत घडवा.
सागर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर वाचन, चिंतन आणि मननाची जोड दिल्यास अभ्यास परिपक्व होतो असे सांगितले.
शिरीष चिटणीस म्हणाले, पुढील काळात अभ्यासाबरोबर कला, संगीत, नृत्य व लेखनकौशल्यही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. अशा संमेलनामुळे विद्यार्थ्यांची अष्टपैलू व्यक्तिमत्वे घडतात.
कुलदीप मोरे यांनी शिक्षक व पालकांनी दिलेल्या संस्कारांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. अक्षय भोसले यांनी विद्यार्थ्यांना छंद जोपासण्याचा सल्ला देताना, छंदाशिवाय यश प्राप्त होऊ शकत नाही असे सांगितले.
शिल्पा चिटणीस म्हणाल्या, अशा कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांना आपली कला ओळखण्याची संधी मिळते. वाचन, वक्तृत्व, नृत्य व लेखन यांना नवी दिशा मिळते. शशिकांत जमदाडे व नंदा कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नितीनकुमार कसबे, बाळकृष्ण इंगळे, हणमंत खुडे, राहुल घोडके, दिलीप सावंत, रमेश महामुलकर आदी उपस्थित होते. शशिकांत जाधव यांनी सर्वांचे आभार मानून संमेलनाचा समारोप केला

