कुंडल वन प्रबोधिनीकडून जैवविविधता उद्यानाची निर्मिती – महासंचालक जे. पी. त्रिपाठी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२३ । सांगली । कुंडल वन प्रबोधिनीस हस्तांतरित करण्यात आलेले ९.८९ हेक्टर वनक्षेत्र हे प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना क्षेत्रीय कामाची प्रात्यक्षिके, मृद व जलसंधारण कामाची विविध मॉडेल्स तयार करणे, रोपवाटिका तंत्र इत्यादी कामांसाठी देण्यात आले आहे. तसेच या क्षेत्रात जैवविविधता उद्यान, रोपवाटीका, गांडूळखत प्रकल्प, औषधी वनस्पती लागवड अशा स्वरुपाची कामे करण्यात येत आहेत, अशी माहिती कुंडल वन प्रबोधिनीचे महासंचालक जे. पी. त्रिपाठी यांनी दिली.

कुंडल गट क्र. २९५९ मधील ५.५०४ हेक्टर वनक्षेत्र तसेच गट क्रमांक २९९७ मधील ४.३८६ हेक्टर वनक्षेत्र असे एकूण ९.८९ हेक्टर वनक्षेत्र प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याकडील आदेशान्वये दिनांक 30 नोव्हेंबर 2019 रोजी कुंडल वन प्रबोधिनीस हस्तांतरित करण्यात आले आहे. कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने), कुंडल ही भारतातील एक अग्रगण्य प्रशिक्षण संस्था आहे. येथे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना व राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाते. तसेच भारत सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या अधिनस्थ संचालक, वन शिक्षण देहरादून यांच्याकडून देशाच्या विविध राज्यांतील नव्याने सेवेत रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना या ठिकाणी १८ महिने कालावधीच्या प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. सध्या केरळ, पश्चिम बंगाल व जम्मू काश्मीर या राज्यांतील ४४ प्रशिक्षणार्थीना येथे १८ महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती कुंडल वन प्रबोधिनीचे महासंचालक जे. पी. त्रिपाठी यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!