क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे चारित्र्यसंपन्न राजकारणी निर्माण करा

संपतराव मोरे; ‘आमचा स्वाभिमान, सातारचे प्रतिसरकार’ व्याख्यानाचे आयोजन


सातारा- श्रीमती विजयाताई जाधव यांचा सत्कार करताना ह. भ. प. डॉ. सुहास फडतरे. त्यावेळी जेष्ठ पत्रकार व साहित्यिक संपतराव मोरे, विजय मांडके, मधुसूदन मोहिते, धनंजय जाधव, सौ.भारती मोहिते.

स्थैर्य, सातारा, दि.17 ऑक्टोबर : क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेले सातारचे प्रतिसरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे असे होते. इंग्रजधार्जिण्या शोषकांच्या विरोधात ते कार्यरत होते. म्हणूनच ते आमचा अभिमान आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे चारित्र्यसंपन्न असे राजकारणी व समाजकारणी निर्माण करण्याचा ध्यास घेतला पाहिजे हेच खरे त्यांना अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन जेष्ठ स्तंभलेखक व पत्रकार साहित्यिक संपतराव मोरे यांनी सातारा येथे बोलताना केले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त ‘आमचा स्वाभिमान, सातारचे प्रतिसरकार’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

कार्यक्रमास गाडगे महाराज मिशनचे चेअरमन मधुसूदन मोहिते, ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे महाराज विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे प्रवक्ते विजय मांडके होते. यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी ह.भ.प. जिजाबा मोहिते महाराज यांच्या कन्या व क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सहवास लाभलेल्या श्रीमती विजयाताई जाधव यांचा शाल, पुस्तक व क्रांतिसिंह नाना पाटील यांचे छायाचित्र देऊन ह. भ. प. डॉ. सुहास फडतरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

संपतराव मोरे म्हणाले, सध्याच्या काळात राजकीय नेत्यांची बेताल वक्तव्ये दिसून येत आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील हे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात ज्या साधनसूचितेने वागले. तशाप्रकारची विचारधारा सध्याच्या राजकारण्यांच्याकडून पूर्णपणे बाजूला गेलेली आहे. अशावेळी क्रांतिसिंहांचा विचारांचा वारसा जपण्याचे काम होत आहे. श्रीमती विजयाताई जाधव यांचा उचित सन्मान करणे हे योग्यच आहे.

ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी वारकरी संत व सत्यशोधकी चळवळीचा विचार घेऊन समतेचे विचार समाजामध्ये प्रस्थापित करण्याचे काम केले. अशाप्रकारचे काम करताना त्यांनी शोषकांना धडा शिकवण्यासाठी प्रति सरकार स्थापन केले. प्रति सरकारच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले. त्याचबरोबर कर्मवीरांना आणि गाडगे महाराजांना आदर्श मानून समाजात शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. सध्याच्या काळातील राजकारण्यांना सातारचे प्रतिसरकार म्हणजे काय असते हे दाखवून दिले पाहिजे. यासाठी तरुणांनी मोठ्याप्रमाणात उठाव केला पाहिजे.

विजय मांडके म्हणाले, विद्रोही सांस्कृतीक चळवळ व विद्रोही साहित्य संस्कृती संमेलने घेण्यामागची भूमिका सांगितली. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंधरावे विद्रोही साहित्य संमेलन हे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्यास समर्पित करत आहोत असे सांगितले.

या कार्यक्रमास ह. भ. प. जिजाबा मोहिते यांचे कुटुंबीय, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते नेते विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. प्रा. गौतम काटकर यांनी सूत्रसंचालन केले. शिवराम ठवरे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!