स्थैर्य, सातारा, दि. २१ : लॉकडाउनच्या काळात मुंबईहून गावी आलेल्या नवोदित अभिनेत्याने स्थानिकांच्या कलागुणांना वाव देण्याचं ठरवलं. एकाच बैठकीत विषय आणि पात्रं निश्चित झाली. गावच लोकेशन झालं आणि एका दिवसात सामाजिक संदेश देणारी शॉर्टफिल्म तयारही झाली. ‘अनपेक्षित’ नावाने या फिल्म सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
परळी खोर्यातील अंबवडे बुद्रुुक गावचा योगेश जाधव मुंबईत नवोदित कलाकार आहे. मालिकांमध्ये भूमिका साकारणारा योगेश लॉकडाउनच्या दिवसात गावी आला. तिथंच त्याची निखिल जाधव, गणेश जाधव व जीवन पिलावरे यांच्याशी गट्टी जमली. बसून- बसून कंटाळा आलाय म्हणत तिघंही काहीतरी वेगळं करायचं म्हणून विचार करू लागले. आपली आवड व समाजाची गरज या दोन्ही गोष्टींचा विचार करून त्यांनी शॉर्टफिल्मद्वारे सामाजिक संदेश देण्याचं निश्चित केलं. याची संकल्पना संतोष जाधव यांची आहे. गणेश आणि जीवन कॅमेरा हाताळायला उत्तम होते तर निखिल संपादनात उत्तम होता. योगेशने पटकथा लिखाण, दिग्दर्शन यासह अभिनयाची जबाबदारी स्वीकारली व शॉर्टफिल्मचे चित्रीकरण सुरू झाले.
अंबवडेच्या तरुणाईने 15 दिवसांपूर्वी अनपेक्षित या फिल्मचे शूटिंग केले. विषयाची स्पष्टता असल्याने पटकथा अवघ्या अर्ध्या तासात तयार झाली. त्यानंतर अंबवडे व बामणोली येथील आरोग्य केंद्रात जाऊन चित्रीकरणाला अवघा अडीच तास लागला. या फिल्मचे संपादनही मोबाईलवरच दोन तासात झाले. एकूण पाहता अवघे सहा तास व चार कलाकारांना बरोबर घेऊन ही फिल्म तयार झाली. यात योगेश सोडला तर सर्वचजण पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले.
पारंपरिक धाटणीची पटकथा टाळायचं योगेशनं ठरवलं. त्यामुळे या प्रॉडक्शनचं नाव अनपेक्षित असे निश्चित करण्यात आलं. कोणतीही कलाकृती सादर करताना त्यातील भाव सच्चे ठेवत शेवट वास्तवाला धरणारा भाव करायचं निश्चित झालं. दीड महिन्यापूर्वी तयार केलेली चकवा व आता दहा दिवसांपूर्वी व्हायरल झालेली अपघात या दोन्ही फिल्मचा शेवट धक्कादायक आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवून कथेला अनपेक्षित कलाटणी देऊन, त्यातून सामाजिक संदेश देण्याचा हा प्रयत्न अनेकांना भावला. त्याबाबत समाज माध्यमांवर प्रतिक्रियाही उमटल्या.